एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार, शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्ट या सर्व प्रस्तावित आरोपांबाबत आता सुनावणी दरम्यान सर्व आरोपींचं म्हणणं ऐकून घेईल. त्यानंतर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडेल.
मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी एनआयएनं आरोपींविरोधात 17 आरोपांची यादी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टापुढे सादर केली आहे. याप्रकरणी एकूण 15 आरोपी आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पाचजण फरार आहेत. तर न्यायालयीन कोठडीदरम्यान फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांविरोधात यूएपीए अंतर्गत दहशतवादी कारावाया करणं, राष्ट्रीय एकात्मता आणि सलोखा झुगारत समाजात असंतोष पसरवणं तसेच देशाविरोधात युद्ध पुकरणं असे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यात आरोपींना फाशीची शिक्षाही होऊ शकते.
राष्ट्रीय तपासयंत्रणेनं एकूण 17 प्रस्तावित आरोपांची यादी कोर्टात सादर केली आहे. यातील काही मुख्य आरोप पुढील प्रमाणे आहेत :
- आरोपींनी भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केला आहे.
- आरोपींनी एम - 4 या अत्यंत आधुनिक हत्यारासाठी आणि त्याच्या 4 लाख गोळ्यांसाठी 8 कोटी रूपयांचा निधी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.
- त्याचसोबत क्यूएलझेड 87 हे ऑटोमेटिक ग्रेनेट लाँचर, आणि जीएम 94 हे रशियन ग्रेनेड लाँचर मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.
- दहशतवादी संघटनांच्या मदतीनं त्यांचा देशात विविध ठिकाणी विस्फोट घडवून हिंसाचार करण्याचा बेत होता.
- प्रक्षोभक भाषण, गाणी, पथनाट्य यांच्या माध्यमातून प्रतिबंधीत नक्षली साहित्य आरोपींकडनं समाजात पसरवलं जात होतं.
- जेएनयूसह देशातील विविध विद्यापीठातून विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांत सामिल करून घेतलं जात होतं.
- सर्व आरोपींविरोधात आयपीसी नुसार कलम 120बी (कट रचणे), 115 (हिंसा माजवणे), 121, 121ए (देशाविरोधीत युद्ध पुकारणे), 124ए (देशद्रोह), 153ए (हत्यार बाळगणे), 505(1)बी (प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करणं), 34 (सर्वांचा एकच हेतू)
- तर UAPA (दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार) कलम 13, 16, 17, 18, 18a, 18b, 20 (दहशतावदी कारवाया करणं) तर कलम 38, 39, 40 (दहशतवादा संघटनेत सहभाग) अश्या विविध आरोपांचा समावेश आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्ट या सर्व प्रस्तावित आरोपांबाबत आता सुनावणी दरम्यान सर्व आरोपींचं म्हणणं ऐकून घेईल. त्यानंतर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडेल. दरम्यान या प्रकरणातील अनेक आरोपींना आपल्या अटकेला तसेच तपासयंत्रणेनं लावलेल्या आरोपांना हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे.
तपासयंत्रणांची आजवरची कारवाई
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषद पार पडली होती. ज्यातील प्रक्षोभक भाषणांमुळे 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं हिंसाचार झाल्याचा आरोप करत 8 जानेवारी 2018 रोजी पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली होती. ज्यात पोलिसांनी तीन आरोपपत्र दाखल केली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं याप्रकरणी तपास करत नोव्हेंबर 2018 5 हजार पानी आरोपपत्र दाखल करत पाच जणांना अटक केली. ज्यात नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राधापक शोमा सेन यांच्यासह महेश राऊत आणि सुधीर ढवळेला अटक केली.
त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये यात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात आलं ज्यात वकील सुधा भारद्वाज, तेलगु कवी वरवरा राव, सामाजिक कार्यकर्ता अरूण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले.
त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. राष्ट्रीय तपासयंत्रणेनं याप्रकरणी तब्बल 10 हजार पानांचं आरोपपत्र सादर केलं. ज्यात फादर स्टॅन स्वामी, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, प्राध्यापक हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्याती जगताप यांच्यासग फरार आरोपी कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडेविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप लावण्यात आले आहेत.