Nitin Gadkari :पुढील निवडणुकीसाठी गडकरी सज्ज; म्हणाले, मत द्यायच तर द्या, नाहीतर...
Nitin Gadkari : पुढील निवडणुकीत पोस्टर लावणार नाही, कटआउटही लावणार नाही तरी लोक मतदान करतील असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. लोकांना कामे करणारा माणूस हवा असतो असं त्यांनी सांगितले.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. गडकरी यांनी म्हटले की, पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही. कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नसल्याचे ठरवलं आहे. निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोक मत देतील असे सांगताना लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत असेही त्यांनी म्हटले.
मुंबईतील अंधेरी येथील टऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट'च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, लोक ज्यांना निवडून द्यायच त्याला निवडून देतात. लोकांना चांगलं काम करणारा पाहिजे असतो. मी आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागताला किंवा पोचवायला एकही माणूस येत नाही. मी स्वत: चा कटआउट लावत नाही आणि दुसऱ्याचाही कटआउट लावत नसल्याचे त्यांनी सांगितले.
चांगली सेवा द्या, लोक खिशातून पैसे काढतील
यावेळी नितीन गडकरी यांनी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर भर दिला. त्यांनी म्हटले की, मुंबई-पुणे महामार्ग बांधला टोलच्या नावाने ओरड सुरू झाली होती. त्यावर वेळ तुमचा वाचला, वाहतूक कोंडी कमी झाली, पेट्रोल डिझेलची बचत झाली ना मग त्याचे पैसे टोलला द्यावा असा मुद्दा मांडला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले असल्याचे सांगत लोकांना तुम्ही चांगली सेवा दिल्यास ते पैसे काढण्यास तयार होतील असेही गडकरी यांनी सांगितले. आता तुम्ही नरिमन पॉईंट ते वसई असा प्रवास अवघ्या 15 मिनिटात करणार आहात. त्यासाठी काम सुरू आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करा
आतापर्यंत 45 लाख कोटींची कामे केली आहेत. कामांसाठी निविदेसाठी आम्ही ई-टेंडरिंग प्रक्रिया राबवत आहोत. तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे हे आम्ही पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना नगरपालिका, महापालिकेत येण्याची आवश्यकताच भासली नाही पाहिजे. नागरी कामे मोबाइलवर झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका महापालिकामध्ये जेवढी गुणवत्ता हवी तेवढी गुणवत्ता दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दहा दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना भेटल होतो. त्यावेळी त्यांनी पावसळ्यात जुहू अंधेरीमध्ये पाणी भरत असल्याचे सांगितले. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, नियोजन जर नगरपालिका आणि महानगरपालिकेला दिले तर हा प्रश्न राहणार नाही. त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. तर ते काम कसं करणार, असा सवालही त्यांनी केला.
राज्यात ट्री-बँक हवी
पर्यावरण मंत्र्यांना ट्री-बँकची कल्पना सुचवली आहे. महाराष्ट्रात पर्यावरण, झाडांबाबत काय स्थिती आहे हे पाहण्यास सांगितले आहे. झाडांची हिरवळ वाढवली पाहिजे. नगरपालिका आणि महापालिकेने ट्री-बँक सुरू करावी अशी सूचनाही नितीन गडकरी यांनी केली. बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस आपण दाखल केल्या आहेत. त्यामुळे स्वस्तात प्रवास होणार असून खर्चही कमी होणार आहे. डिझेलसाठी खर्च होणाऱ्या पैशांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या इलेक्ट्रीक कारला एक वर्षांची वेटिंग असल्याचे त्यांनी सांगितले.