Nitin Gadkari : भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डातून गडकरी बाहेर, राष्ट्रीय पातळीवर गडकरींचं वजन घटत का चाललंय?
BJP Parliamentary Board : संसदीय समिती, भाजप पक्षातल्या सर्वोच्च समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे. आज भाजपच्या संसदीय समितीची पुर्नरचना जाहीर करण्यात आली.
BJP Parliamentary Board : भाजपच्या (BJP) संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका आज जाहीर झाल्यात. त्यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) सर्वात मोठा संदेश दडला आहे. नितीन गडकरींची (Nitin Gadkari) पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट ( BJP Parliamentary Board ) हा सगळ्यात मोठा शॉक मानला जातोय. पाहुयात काय काय वैशिष्ट्ये आहेत भाजपच्या आजच्या संघटनात्मक बदलांची.
भाजपच्या पक्षीय संघटनेतला ( BJP Parliamentary Board ) सर्वात मोठा बदल बुधवारी जाहीर झाला आणि त्यात सर्वात धक्का महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना बसला आहे. संसदीय समिती, भाजप पक्षातल्या सर्वोच्च समितीतून ( BJP Parliamentary Board ) नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे. आज भाजपच्या संसदीय समितीची पुर्नरचना जाहीर करण्यात आली. त्यात काही महत्वपूर्ण बदल पक्षानं केले आहेत.
भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी बाहेर -
भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी दिली गेली आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आलं आहे. संसदीय समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी एल संतोष या अकरा जणांचा समावेश असेल. भाजपच्या या संसदीय समितीत आता महाराष्ट्रातला एकही नेता नसेल
देवेंद्र फडणवीस यांना संधी -
गडकरींना संसदीय समितीतून बाहेर करण्यात आलंय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आलंय. फडणवीसांसह अनेक माजी मुख्यमंत्र्यांना संसदीय बोर्डात समावेश होईल असं म्हटलं जात होतं. पण त्याऐवजी त्यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिलं गेलंय. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, त्यातली तिकीट वाटपं अंतिम करण्याचं काम याच महत्वपूर्ण समितीत केलं जातं. खरंतर योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या संसदीय समितीत स्थान मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांसह कुठल्याच मुख्यमंत्र्यांना यात स्थान दिलं गेलेलं नाही.
गडकरींना वगळण्याचा काय संदेश?
महाराष्ट्र भाजपवर फडणवीसांचं वर्चस्व आहेच, आता राष्ट्रीय पातळीवरही भाजपचा महाराष्ट्रातला नेता म्हणून पहिली पसंती फडणवीसांना देण्यात आली आहे. नितीन गडकरींच्या राष्ट्रीय पातळीवरच्या घटत्या वजनाचं निदर्शक आजच्या घडामोडीत पाहायला मिळालं. नितीन गडकरी सध्या 65 वर्षांचे आहेत, 77 वर्षांच्या येडीयुरप्पा यांना संसदीय समितीत स्थान दिलं गेलंय. एरव्ही भाजपमध्ये पंचाहत्तरीचा नियम लावला जातो, पण येडीयुरप्पांसाठी तो शिथील का गेला? आणि गडकरींना इतक्या लवकर एक्झिट का? हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आता या संघटनात्मक बदलांमधून मोदीं-शाहांच्या भाजपनं एक नवा संदेश दिला आहे.
संसदीय बोर्डात एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी केवळ एक महिला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर या महत्वाच्या समितीत निर्मला सीतारमण किंवा स्मृती इराणी यांचा समावेश होईल असं वाटलं होतं. पण त्याऐवजी हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी दिली आहे. या संघटनात्मक बदलांमधून भाजपच्या अंतर्गत रचनेतही आता मोदी-शाहांचीच पकड मजबूत झाल्याचंही दिसतं आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाची संपूर्ण यादी
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जातिया
बी एल संतोष (सचिव)
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जातिया
भूपेंद्र यादव
देवेंद्र फडणवीस
ओम माथूर
बी.एल.संतोष (सचिव)
वनथी श्रीनिवास (पदसिद्ध)