Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
तिकडे जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अडानी” असे काम करायचे, अशा हिंदुत्वाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही आणि हे हाणून पाडलेच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी झाडतोडीच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. प्रभू रामचंद्र वास्तव्याची श्रद्धा असलेल्या तपोवन परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत 60 हून अधिक प्रजातींची झाडे, त्यातील अनेक औषधी वनस्पती आणि ऐतिहासिक परंपरा असताना, कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली येथे ‘कत्तली’ होणार असल्याचे ते म्हणाले. या तपोवनाने आपल्याही पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. गिरीश महाजन म्हणालेत एक झाड कापलं तर दहा झाड लावणार तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत? आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
भाजपचे हिंदुत्व हे थोतांड आहे
भाजपच्या हिंदुत्वावर थेट प्रहार करत त्यांनी म्हटले की, भाजपचे हिंदुत्व हे थोतांड आहे. तिकडे जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अडानी” असे काम करायचे, अशा हिंदुत्वाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही आणि हे हाणून पाडलेच पाहिजे. तपोवनासारखी पवित्र जागा कंत्राटी स्वार्थासाठी मारली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट प्रश्न केला की, “प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात?”
झाडांची हत्या करण्याच्या निर्णयाला आमचा कडाडून विरोध
उद्धव ठाकरे म्हणाले की साधुग्राम उभारण्याला आमचा विरोध नाही, पण साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील हजारो झाडांची हत्या करण्याच्या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे. सरकार हे काम पुण्य कमावण्याचा उपद्व्याप दाखवत करत आहे, परंतु प्रत्यक्षात हा निसर्गविनाशाचा प्रयत्न असून यात हिंदुत्वाचा आडोसा घेतला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी विचारले की गेल्या कुंभमेळ्यात वापरलेली जागा यावेळी का वापरली जात नाही, नवी झाडे लावण्याइतकी रिकामी जागा असल्याचे सांगितले जाते तर साधुग्राम तिथेच का उभारला जात नाही? आधी निसर्ग मारायचा आणि नंतर “नवीन झाडे लावू” असा दिखावा करण्याचा हा भ्रष्टाचार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हा कंत्राटदारांचा विकास करण्याचा डाव
उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांच्या हातातील टेंडरच्या दस्तऐवजात तपोवन परिसरात पुढे कॉन्फरन्स हॉल आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याची स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे कुंभमेळा हा फक्त कारण म्हणून पुढे केला जात असून प्रत्यक्षात हा कंत्राटदारांचा विकास करण्याचा डाव आहे. उद्या तपोवन ही भूमी कोणाच्या गळ्यात घालण्यासाठीच आज झाडे नष्ट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या























