Uddhav Thackeray : ठरलं तर! 5 जुलै रोजी मोर्चा होईल किंवा सभा, पण एकत्र जल्लोष करणार हे नक्की: उद्धव ठाकरे
Shiv Sena MNS Mumbai Morcha : मराठी माणून एकत्र येऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केले. पण आता झालेली एकजुट ही कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : मराठी माणसाची शक्ती पाहून या सरकारने माघार घेतली, हिंदी सक्ती मागे घेतली. त्यामुळे हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून भाजपने सर्व प्रयत्न केले असंही ते म्हणाले. 5 जुलै रोजी विरोधाचा मोर्चा होणार होता. पण आता तो होणार नसून त्या ऐवजी विजयी मोर्चा किंवा जल्लोष सभा घेण्यासाठी चर्चा करू अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राज ठाकरेंशी बोलणं सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे 5 जुलै रोजी कार्यक्रम होणार हे स्पष्ट झालं आहे.
मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली
उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण त्या विरोधात मराठी माणसाने एकजुट दाखवली. शिवसैनिक आणि इतर पक्ष, संस्थानी त्याला विरोध करत सरकारच्या जीआरची होळी केली. मराठी माणसाच्या दबावामुळे राज्य सरकारने हा जीआर रद्द केला. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली."
5 जुलैला जल्लोष कार्यक्रम होणारच
या आधी हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार होता. पण सरकारच्या जीआर रद्दच्या घोषणेनंतर हा मोर्चा निघणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण 5 तारखेला विजयी मोर्चा काढायचा किंवा काही सभा घ्यायची का यावर विचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 5 जुलै रोजी काहीतरी कार्यक्रम नक्की घेणार असंही ते म्हणाले. या संदर्भात मनसे, इतर पक्ष आणि मराठीच्या लढ्यात उतरलेल्या सर्व संस्थांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी एकजुट कायम असावी
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केला. पण मराठी एकजुटीसमोर त्यांना नमावे लागले. एकत्रित मोर्चा होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण यापुढे संकट आल्यावर जागे व्हायचे असं नको. त्यामुळे ही एकजुट कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य सरकारकडून हिंदीचा जीआर रद्द
पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. या संदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावे की नाही यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती माशेलकर समितीचा अभ्यास करणार आणि त्यावर शिफारशी करणार आहे. त्यानंतर राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने हिंदीचा जीआर रद्द केला हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं मत संजय राऊत तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
ही बातमी वाचा:























