Remdesivir injection | ठाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजर करणाऱ्या आरोपींमध्ये आतिफ फरोग अंजुम आणि आरोपी प्रमोद ठाकूर यांचा समावेश आहे. या आरोपींवर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फिर्यादी कैलाश दशरथ खापेकर यांनी तक्रार नोंदवली आहे.
ठाणे : ठाण्यात 21 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा सापळा रचून पोलिसांनी पकडला आहे. हा साठा घेऊन जाणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. यापैकी प्रत्येक इंजेक्शन 5 ते 10 हजार रुपयांना विकले जाणार होते. धक्कादायक म्हणजे यातील काही इंजेक्शनवर नॉट फॉर सेल, महाराष्ट्र शासन असं लिहिले आहे. याचा अर्थ महापालिकेच्या कोविड सेंटरमधून हे इंजेक्शन फुकट घेऊन बाहेर महागड्या किंमतीत विकले जाणार होते.
अटक केलेले दोघांपैकी एकजण मुलुंडच्या खासगी नर्सिंग होममध्ये ब्रदर म्हणून काम करतो. दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले होते, तर आता या इंजेक्शनचा काळा बाजार समोर आल्याने, ठाण्यात संपूर्ण वैद्यकीय विभाग भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलाय का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रासाठी येत्या तीन दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींमध्ये आतिफ फरोग अंजुम आणि आरोपी प्रमोद ठाकूर यांचा समावेश आहे. या आरोपींवर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फिर्यादी कैलाश दशरथ खापेकर यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार वागळे इस्टेट पोलिसांनी कलम 420, 34 परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सह कलम 3(2)(सी) जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1995 चे उल्लंघन आणि कलम 7(1)(a)(ii) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहेत. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.