महाराष्ट्रासाठी येत्या तीन दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
महाराष्ट्रासाठी येत्या तीन ते चार दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात दिली आहे. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करेल, असंही ते म्हणाले.
पुणे : महाराष्ट्रासाठी येत्या तीन ते चार दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात दिली आहे. तसेच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहेस, असंही ते म्हणाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत त्याचे आपण पालन केले पाहीजे. पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. असे मत प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत' आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी जावडेकर म्हणाले की, चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संपर्क शोधून त्यांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रासाठी व्हेंटिलेटर मिळण्याबाबत आपण केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी, मंत्र्यांशी बोलणे केले असून 1121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील . तसेच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे असे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांचे ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणारआहे त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.