पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून पतीकडून मोबाईलवर ट्रिपल तलाक, भिवंडीतील प्रकार
खालिद शेख विरोधात आयपीसी कलम 323 , 504 सह मुस्लीम स्त्रीयांच्या लग्नाच्या हक्कांचे संरक्षण अध्यादेशच्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
भिवंडी : पत्नीला मोबाईलवरुन ट्रिपल तलाक दिल्याची घटना भिवंडी शहरात समोर आली आहे. भिवंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नी माहेरी गेल्याने मोबाईलवरून तिला जाब विचारला. आणि बोलणं सुरु असतानाच तिला तीन वेळा तलाक म्हणत तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. याबाबत पीडित महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शास्त्रीनगर भागातील 24 वर्षीय पीडित महिला पती खालिद जावेद शेख यासोबत राहत होती. 29 ऑगस्ट रोजी पत्नी भिवंडी शहरातीलच गैबीनगर औलिया मशीद परिसरातील आपल्या माहेरी गेली होती. त्यावेळी पती घरी आल्यावर त्याला पत्नी दिसून न आल्याने त्याने तिला फोन केला आणि तू आईच्या घरी का गेलीस याबाबत जाब विचारत शिवागाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात पती खालिद शेख याने पत्नीस मोबाईलवरच मला तुझ्यासोबत रहायचे नसून मी तुला या क्षणी तलाक देत असल्याचे सांगितलं.
या प्रकरणी पत्नीने शांतीनगर पोलीस ठाण्यात पती खालिद शेख याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खालिद शेख विरोधात आयपीसी कलम 323 , 504 सह मुस्लीम स्त्रीयांच्या लग्नाच्या हक्कांचे संरक्षण अध्यादेशच्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.