'ट्रिपल इंजिन सरकार, ट्रिपल वसुली'; अमोल कोल्हेंनी शेअर केला मुंबईच्या सिग्नलवरील धक्कादायक अनुभव
Amol Kolhe : मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाहतूक पोलीस कर्मचारी यांना टार्गेट देण्यात आल्याचे कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुंबई : वाहतूक सिग्नलवर (Traffic Signal) पोलिसांच्या वसुलीचा अनेकांना अनुभव येतो. मात्र, हाच वसुलीचा फंडा किती भयंकर आहे याचा अनुभव स्वतः राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना आला असून, पोलिसांच्या वसुलीची थेट आकडेवारीच त्यांनी समोर आणली आहे. मुंबईच्या सिग्नलवर आलेला एक धक्कादायक अनुभव कोल्हे यांनी ट्वीट करत शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोलिसांना प्रत्येक चौकात वसुलीसाठी टार्गेट ठरवून देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजार रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचारी यांना टार्गेट देण्यात आल्याचे कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत ट्वीट करत खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे की, "आजचा धक्कादायक अनुभव!... मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले. तो मेसेज पाहून मला धक्काच बसला. मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000 प्रति दिन म्हणजे, फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये जमा होतात. इतर शहरांचं काय?... त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी आणि अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास, वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल. शेवटी ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली" असा टोलाही कोल्हे यांनी लगावला.
आजचा धक्कादायक अनुभव-
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 2, 2023
मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!… pic.twitter.com/TJ3oq2oSsO
अनेकदा पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वाद...
मुंबईच्या चौका-चौकात वाहतूक पोलीस तैनात असल्याचे नेहमी पाहायला मिळत असते. दरम्यान, अनेकदा वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वाद होतांना देखील पाहायला मिळत असते. अशा वादाचे अनेक व्हिडिओ देखील आतापर्यंत समोर आले आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांकडून थेट वसुली करण्यात येत असल्याचे देखील अनेकदा आरोप झाले आहेत. तर, इतर जिल्ह्यातील पासिंग असलेल्या वाहनधारकांना अडवून नाहक त्रास दिला जात असल्याचे देखील आरोप होतात. त्यातल्या त्यात आता खुद्द खासदार कोल्हे यांनी वाहतूक पोलिसांच्या वसुलीची हकीकत मांडल्याने, मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेबद्दल वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे.
वसुली कोणाच्या सांगण्यावरून...
दिलेली वसुली केल्याशिवाय जागा सोडायची नाही, अशा आम्हाला सूचना असल्याची हकीकत महिला वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी आपल्याकडे मांडली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आदेश नेमकं कोणाकडून दिले जाते याबाबत जाणून घेण्याची मला आणि जनतेला देखील उत्सुकता असून, संबंधित मंत्रीमहोदयांनी यावर प्रकाश टाकावे, असेही कोल्हे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Mumbai Traffic : गाडीवरील दंड भरा अन्यथा कोर्टात खेचलं जाणार, वाहतूक पोलिस देणार थकबाकीदारांना नोटीस