लोखंडी खुर्चीत विद्युतप्रवाह उतरला, उल्हासनगरमध्ये 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरमध्ये शॉक लागून 19 वर्षी तरुणाचा मृत्यू झाला. शफिउल्ला शाह हा तरुण भंगारच्या दुकानात लोखंडी खुर्चीवर बसला असताना अचानक विजेचा शॉक लागला आणि याच त्याचा अंत झाला.
उल्हासनगर : शॉक लागून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी परिसरात घडली आहे. शफिउल्ला शहा असं शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. रविवारी (27 मार्च) दुपारच्या सुमारास शफिउल्ला हा भंगारच्या दुकानात लोखंडी खुर्चीवर बसला असताना अचानक विजेचा शॉक लागला आणि तो खाली पडला. त्याला तात्काळ उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शफिउल्लाचं पंजाबी कॉलनी परिसरात भंगारचं दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो दुकानात गेला परंतु लोखंडी खुर्चीच्या खालील वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्याचा संपर्क लोखंडी खुर्चीशी आला आणि शॉक लागला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, शफिउल्ला शाह यांच्या मित्रांनी मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. एका मित्राच्या आरोपानुसार, "रुग्णालयातील डॉक्टरांनी शफिउल्लाला रिक्षातच तपासलं आणि त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तुम्हाला इतर ठिकाणी तपासायचं असल्यास तपासा असंही डॉक्टर म्हणाले. यानंतर शफिउल्लाला दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या क्रिटीकेअर रुग्णालयात नेत असताना त्याच्या छातीवर जोर दिला असता शफिउल्लाने हालचाल केली. परंतु रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याने प्राण सोडले होते. पण मध्यवर्ती रुग्णालयात व्यवस्थित तपासणी केली असती किंवा उपचार केले असते तर कदाचित तो वाचला असता."
बीडमध्ये लोखंडी छतावर विद्युतप्रवाह उतरुन बहिण भावाचा मृत्यू
अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी बीडमध्ये घडली होती. घराच्या लोखंडी छतावर विद्युतप्रवाह उतरल्याने दोन चिमुकल्या चुलत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील टालेवाडी इथे घडली होती. माजलगाव तेलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी येथील साक्षी भारत बडे (वय 12 वर्षे) आणि सार्थक अशोक बडे (वय 8 वर्षे) हे भरत बडे यांच्या घरात खेळत होते. यावेळी सार्थक छतावर जाण्यासाठी चढत असताना त्याला शॉक लागला. त्यानंतर साक्षी त्याला पाहायला गेली असता तिलाही करंट लागल्याने हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला.