Torres Scam : शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, टोरेसने सगळ्यांनाच चुना लावला!
Torres Scam : मुंबईतील प्रदीपकुमार वैश्य नावाच्या भाजीपाला विक्रेत्यानं टोरेस कंपनीत जवळपास साडे चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
मुंबई : टोरेस कंपनीच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात भाजीवाला प्रदीपकुमार वैश्य यांचे साडे चार कोटी रुपये बुडाले आहेत. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी सर्व माहिती दिली. 30 तारखेपासून पेमेंट येणं बंद झालं. त्यावेळी विचारलं असता नववर्ष आहे, बँकांना सुट्ट्या आहेत, त्यामुळं पेमेंट आलं नाही. पुढील आठवड्यात दोन्ही पेमेंट येतील, असं सांगितलं. सचिन शर्मा यानं फ्लोअरला येऊन बोनस, गुंतवणुकीवरचं पेमेंट मिळेल, असं सांगितलं होतं. तांत्रिक कारणं, नववर्ष, बँकांना सुट्टी असा उल्लेख असलेलं पत्रक कार्यालयाबाहेर लावलं होत, असं प्रदीपकुमार वैश्य म्हणाले.
कंपनी दादरमध्ये कधी आली?
टोरेस ज्वेलरी कंपनी 3 फेब्रुवारी 2024 ला चालू झाली होती. ग्रँड ओपनिंग झालं होतं, ज्वेलरीचं दुकान असतं तसं दुकान उघडलं होतं. ग्रँड ओपनिंगच्या दिवशी आम्ही तिथं जाऊन आलो होतो. तिथं सेलिब्रेटी आले होते. मालिकेत काम करणारी लोक आली होती. मोठी कंपनी असेल असं वाटूनही त्यात इंटरेस्ट दाखवला नव्हता. आमच्या बाजूला एक महिला राहते, तिनं मला या कंपनीत पैसे टाकण्यास भाग पाडलं. एक लाख रुपये गुंतवले तर दर आठवड्याला 6 हजार रुपये मिळतील, तुमचे पैसे बुडणार नाहीत, असं तिनं सांगितलं. मात्र, मी पुढचे तीन महिने थांबलो. तीन महिने त्या महिलेच्या खात्यात पैसे येत होते. मार्च, एप्रिल, मेपर्यंत थांबलो, असं प्रदीपकुमार वैश्यनं सांगितलं.
पैसे कधी गुंतवले?
महिलेला फायदा होत आहे तर मला पण फायदा होईल, या विचारानं 21 जूनला त्या महिलेसोबत जाऊन 6 लाख 70 हजारांची गुंतवणूक केली. त्याचे 40200 यायचे, चार पाच हप्ते आले. मला वाटलं कंपनी चांगली आहे.दुसरी शाखा गिरगावमध्ये सुरु झाली होती. शाखा उघडली जातेय तर कंपनीचा विस्ताराचा प्लॅन असेल असं वाटलं. 23 जूनला दुसऱ्यांदा पहिल्यांदा पैसे टाकले. तो पैसा कुठं जात होता ते माहिती नव्हतं. विदेशातील लोक होते, रशियाचे लोक होते. कंपनी चांगली असेल असं वाटलं होतं, असं प्रदीपकुमार वैश्य म्हणाला. इंटरनेटवर सर्च केलं तेव्हा सुर्वेचं नाव यायचं, प्लॅटिनम हर्नचं नाव यायचं. यामध्ये चैन सिस्टीम होती. लकी ड्रॉ काढला जायचा. गिफ्ट दिली जायची. मी 30 ते 40 लोकंना जोडलं, जवळपास 4 कोटींची रक्कम गुंतवली. दुसऱ्या लोकांच्या नावावर पैसे टाकले. आता लोकं पैसे मागायला येत आहेत. एक लिंबू व्यापारी प्रदीपकुमार वैश्यकडे पैसे परत मागण्यासाठी आला होता. टोरेससोबत काही घेणं देणं नाही म्हणतात. आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे. आता सर्व पोलिसांच्या हातात आहे, असं प्रदीपकुमार वैश्य म्हणाला.
इतर बातम्या :