मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
Malegaon : मालेगाव तहसील कार्यालय, मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून बनावट जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
नाशिक : मालेगावमधील (Malegaon) बांग्लादेशी आणि रोहिग्यांना जन्मदाखला दिल्याबाबत चौकशी करण्यासाठी गृह विभागाकडून एसआयटीची (SIT) घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (Dattatray Karale) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आल्याचे पत्र सध्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. मात्र, समिती अध्यक्ष दत्तात्रय कराळे यांना अद्याप गृह विभागाकडून पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एसआयटीच्या अध्यक्षांना पत्र व्यवहार झाला नसल्यानं एसआयटीच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मालेगाव हे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले आहे. मालेगावात सुमारे 1 हजार घसुखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. या प्रकरणी गृह विभागाने एसआयटीची स्थापन केल्याची माहिती समोर आली होती.
बांग्लादेशी, रोहिग्यांना जन्मदाखला प्रकरणी एसआयटीची घोषणा
मालेगाव तहसील कार्यालय, मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून बनावट जन्म प्रमाणपत्रे (Fake Birth Certificates) देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली असून नगरविकास शाखेचे विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा या समितीत समावेश आहे. तहसील कार्यालय अथवा महापालिकेकडून बनावट जन्म दाखले निर्गमित करण्यात आले आहेत की नाही? याचा तपास करण्याचे आदेश गृह विभागाने या समितीला दिले आहेत.
एसआयटी तपासाबाबत प्रश्नचिन्ह
आरोपामध्ये तथ्य आढळल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे देखील गृह विभागाच्या (Home Department) पत्रात म्हटले आहे. मात्र आता समिती अध्यक्ष दत्तात्रय कराळे यांना गृह विभागाकडून पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एसआयटीच्या अध्यक्षांना पत्र व्यवहार नसल्याने एसआयटी तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रकरणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या