(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganeshotsav : कोकणातील गणेशभक्तांचा उद्यापासून टोलमुक्त प्रवास; 'या' मार्गांचा समावेश, सरकारचा आदेश जारी
Ganeshotsav 2023 : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.
मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोकणवासियांना टोल मुक्त प्रवास करता येणार आहे. उद्यापासून 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. याबाबतचा आदेश आज राज्य सरकारने जारी केला आहे.
गणेशोत्सव साठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.
कोणत्या मार्गावर असणार टोल मुक्त प्रवास?
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडून टोल न घेण्याचा निर्णय सरकारने जारी केला आहे. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गांवरील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मार्गांवरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. या खासगी वाहनांसह एसटी महामंडळांच्या बसेसना देखील ही सवलत लागू करण्यात आली आहे.
#गणेशोत्सव साठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (#टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतला आहे. यासंबंधीचा #शासननिर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे. pic.twitter.com/tTSmU9VAgI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 15, 2023
टोलमुक्त प्रवासासाठी पासेस आवश्यक
गणेशभक्तांना टोलमुक्त प्रवास करण्यासाठी आरटीओ, परिवहन विभाग, वाहतूक पोलिसांकडे अर्ज करून स्टीकर्स घ्यावे लागतील. यंत्रणेकडून उपलब्ध करून दिलेली स्टीकर्स लावलेल्या वाहनांना टोलमधून सवलत दिली जाणार आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी “गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना देण्यात आली आहे. परतीच्या प्रवासातही हाच पास ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai- Goa Highway) 27 ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत (28 सप्टेंबर) अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. 27 ऑगस्ट ते 28 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीला बंदी म्हणजे एक महिना अवजड वाहतुकीवर बंदी असणार आहे.