Coronavirus : आज राज्यात 95 नव्या कोरोना रुग्णांचे निदान, JN.1 राज्यात 250 सक्रीय रुग्ण
Coronavirus : शुक्रवार 12 जानेवारी रोजी राज्यात 95 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. दरम्यान सध्या राज्यात JN.1 चे 250 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) डोकं वर काढण्याची चिन्ह आहेत. कारण JN.1 या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यात सध्या JN.1 चे 250 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच शुक्रवार 12 जानेवारी रोजी राज्यात 95 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्याचप्रमाणे आज 146 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
JN.1 प्रकारामुळे चिंता वाढली
कोरोना विषाणू काळानुरुप स्वत:मध्ये बदल करत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांकडून जीनोम सीक्वेंन्सिंग आणि संशोधन सुरु आहे. कोरोनाचा अभ्यास करणार्या संशोधकांनी म्हटलं आहे की, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या शरीराला कोविड-19 विषाणूची सवय झाली आहे. नवीन व्हेरियंटचा संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पण कोरोना विषाणूचे JN.1 बदलेलं स्वरूप एक भीतीदायक आहे. जगभरात JN.1 अतिशय वेगाने पसरत असून हे भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
'या' व्यक्तींना नव्या व्हेरियंटचा धोका सर्वाधिक
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका पाहता धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हे धोक्याचं लक्षण आहे. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये नव्या व्हेरियंटचा धोका वाढतो. या नवा व्हेरियंट आणि ओमायक्रॉन या दोन्ही विषाणूंमध्ये साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे हे दोन्ही अत्यंत संसर्गजन्य आहेत. या विषाणूचे जसजसे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. तसतसा हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य होत असल्याचे दिसून येत आहे.
JN.1 व्हेरियंटचे गंभीर परिणाम
कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात. पहिलं म्हणजे कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला संपवता येणार नसून हा लढा आपल्याचा दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल. तर, दुसरा परिणाम म्हणजे JN.1 व्हेरियंटचा प्रसार भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोकादायक नवीन कोविड व्हेरियंटसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो आणि हे मानवासाठी घातक ठरू शकतं.
JN.1 व्हेरियंट अधिक संसर्गजन्य
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवीन JN.1 सब-व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे. दरम्यान, यातील एक दिलासादायक बाब म्हणजे JN.1 सब-व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असला तरी, त्याची लक्षणे सौम्य आहेत आणि या संसर्गातून रुग्ण लवकर बरे होत आहेत. त्यामुळे हा व्हेरियंट चिंताजनक नसला तरीही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं सागंण्यात येत आहे.
हेही वाचा
Covid-19 : कोरोनाचा मेंदूच्या कार्यावर परिणाम, स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला