ठाण्यात एकाच दिवशी तिघांचा बुडून मृत्यू, एकाच ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोघे बुडाले, दोघांना वाचवले
एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू ठाण्यामध्ये झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन जण बुडाले आहेत. येऊर इथल्या नील तलावात सकाळी एक किशोरवयीन मुलगा तर संध्याकाळी एक तरुण बुडाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
ठाणे : एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू ठाण्यामध्ये झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन जण बुडाले आहेत. येऊर इथल्या नील तलावात सकाळी एक किशोरवयीन मुलगा तर संध्याकाळी एक तरुण बुडाला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर लोकमान्य नगर इथल्या मिलिटरी ग्राउंड जवळ असलेल्या मोठ्या खड्ड्यात एक तरुण बुडाल्याची घटना दुपारी घडली. मुख्य म्हणजे या तिन्ही घटनांमध्ये बुडालेल्या व्यक्तीचाच हलगर्जीपणा आणि बेफिकिरी यांना भोवली असल्याचे समोर आले आहे. ठाण्याच्या अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी जाऊन तिघांचे मृतदेह शोधून ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
रविवारी सकाळीच एका किशोरवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना येऊर इथल्या नील तलावात घडली. प्रसाद पावसकर असे या सोळा वर्षांच्या मुलाचे नाव होते. नौपाडा पोलिस स्थानकात काम करणाऱ्या पोलीस हवालदार मधुकर पावस्कर यांचा तो मुलगा होता. सकाळी मित्रांसोबत साकेत इथे फुटबॉल खेळायला जातो असे सांगून प्रसाद आणि त्याचे पाच मित्र निघाले मात्र ते साकेत इथे न जाता येऊरच्या तलावात पोहण्यासाठी आले. प्रसादला पोहता येत नव्हते मात्र मित्रासोबत त्यांनी उडी घेतली. त्यावेळी त्याच्या डोक्याला पाण्यातील दगड लागून इजा झाली. तसेच त्याचा पाय पाण्यात असलेल्या दगडात अडकल्याने तो बाहेर पडू शकला नाही. दुसऱ्या मित्राला मात्र इतर सर्वांनी मिळून बाहेर काढले त्यामुळे तो वाचला. यामध्ये प्रसादचा दुर्दैवी मृत्यू झाला. मधुकर पावसकर यांना दोन मुलींनंतर आठ वर्षांनी प्रसाद रूपाने पुत्रप्राप्ती झाली होती. नवसाचा मुलगा म्हणून त्याला जीवापाड जपले जायचे. मात्र आज त्याच्याच चुकीमुळे त्याचा जीव गेला.
त्याच येऊर इथल्या तलावात संध्याकाळच्या सुमारास राबोडी परिसरातील पाच ते सहा मित्र पोहायला गेले होते. त्यापैकी दोघांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. मात्र त्यापैकी एकाला मित्रांनी वाचवले पण जुबेर सय्यद या वीस वर्षांच्या तरुणाला ते वाचवू शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील मिलिटरी ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात 33 वर्षाचा सुतेश करावदे हा पोहण्यासाठी गेला होता. मात्र दुर्देवाने तो चिखलात अडकला आणि बाहेर पडू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.
अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी तिघांचा बुडून ठाण्यात झाला आहे. येऊर सारख्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे तलावात जाणाऱ्या आणि धबधब्यात जाणाऱ्या लोकांवर बंदी घालावी अशी मागणी पुन्हा होत आहे.