ठाण्यात तिकिटांच्या रांगेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ठाणे पश्चिम इथे असलेल्या तिकीट रांगेत तिकीट काढण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे अनेक कर्मचारी वैतागलेले दिसून आले आणि त्यांनी आपला रोष देखील व्यक्त केला.
मुंबई : मुंबई लोकल ही केवळ राज्य सरकारी कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली असली तरी आज याच लोकलच्या तिकीट आणि पास काढण्यासाठी मोठ्या रांगा तिकीट काउंटर समोर दिसून आल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग देखील पाळली गेली नाही. त्यामुळे रेल्वे आणि राज्य सरकारच्या प्लॅनिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन वेळा केंद्राकडे लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. केंद्राने ही मागणी मान्य करून 15 जून पासून मुंबई लोकल राज्यातील सरकारी कर्मचारी महानगरपालिकांचे कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी सुरू केली. मात्र 14 तारखेला उशिरा हा निर्णय जाहीर केला नाही अनेकांना लोकल सुरू होणार याबाबत माहिती नव्हती. परिणामी 15 जूनला लोकलमध्ये आणि तिकीट काउंटरवर गर्दी दिसून आली नाही. मात्र आज म्हणजेच 16 तारखेला सकाळपासून ज्या कर्मचाऱ्यांना लोकांनी प्रवास करायचा होता ते कर्मचारी तिकिटांसाठी तासनतास रांगेत उभे असलेले दिसून आले. ठाणे पश्चिम इथे असलेल्या तिकीट रांगेत तिकीट काढण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे अनेक कर्मचारी वैतागलेले दिसून आले आणि त्यांनी आपला रोष देखील व्यक्त केला.
सर्व ठिकाणी कोरोनाचा धोका असताना आज तिकीट आणि 500 साठी लागलेल्या रांगा या अतिशय असुरक्षित अशाच होत्या. तिकिटांसाठी रांगा लागणार हे लक्षात न घेतल्याने तिकीट काउंटर च्या बाहेर सुरक्षित अंतराच्या खुणा केल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळेच लोकांनी देखील बेशिस्तपणे रांगा लावल्या. अनेकांची भांडणे झालेली देखील यावेळी दिसून आली. रांगेत उभे असलेले कर्मचारी एकमेकाला चिटकून आणि गर्दी करून उभे होते. याबाबत आम्ही काही प्रवाशांना विचारले असता त्यांनी, कामावर जाण्याची घाई असल्याचे आणि नाईलाजानेअसे करावे लागत असल्याचे सांगितले. तर काही प्रवाशांनी तिकीट काउंटर मर्यादित असल्याने मोठ्या रांगा आणि गर्दी झाली असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
एबीपी माझाच्या बातमीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्यानंतर ठाणे तिकीट काउंटरवर आर पी एफ चे जवान आणि लोहमार्ग पोलिसांना पाठवण्यात आले. पोलिसांनी लोकांना अनाउन्समेंट करून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावल्या. त्यानंतर दोन काउंटर मध्ये वाढ करून पाच तिकिटांचे काऊंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे सकाळी पिक अवर असताना जी गर्दी झाली होती ती गर्दी हळूहळू कमी झाली.
आजच्या संपूर्ण घटने मागे रेल्वे प्रशासन आणि राज्यसरकार जबाबदार असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. मात्र प्रवाशांची देखील सुरक्षित अंतर राखण्याची जबाबदारी असल्याचे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे होते. लोकल सुरू करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्लॅनिंग करण्यात आली असती तर आज सारखा फज्जा उडाला नसता.