(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Central Railway : पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरले, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा
Central Railway : हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. याचा परिणाम लांब पल्ल्ल्याच्या गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावरील पनवेल (Panvel) ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे रुळावरुन खाली घसरले. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण याचा परिणाम लांब पल्ल्याच्या (Express) गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळतयं. या घटनेमुळे एक्सप्रेसच्या पाच गाड्या उशीरा धावत असल्याची माहिती मध्ये रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न मध्ये रेल्वेकडून करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवार (30 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान या घटनेविषयी समजातच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
रुळावरुन घसरलेले डबे बाजूला सारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान हे डबे कसे घसरले याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश मध्य रेल्वेकडून देण्यात आलेत. पण या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच यामुळे प्रवाश्यांना देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोणत्या गाड्यांचा झाला खोळंबा ?
या अपघातामुळे पाच एक्सप्रेस रखडल्या आहेत. यामध्ये डाऊन मार्गावरील गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ही कळंबोली स्थानकावर थांबवण्यात आली. तसेच एलटीटी-मंगळुरु एक्स्प्रेस ही ठाणे स्थानकावर थांबण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस ही तळोजा ते पंचानंद स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. तसेच अप मार्गावरील कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस या सोमाठाणे रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.
Mail express trains detained with their detained station location are-
— Central Railway (@Central_Railway) September 30, 2023
A) DN Trains-
1) 15065 Gorakhpur-Panvel exp- at Kalamboli
2) 12619 LTT- Mangluru exp- at Thane
3) 09009 Mumbai central- Sawantwadi exp- at taloja panchanand
B) UP Trains-
1) 20931 Kochuveli- Indore exp- at…
लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम नाही
लांब पल्ल्याच्या गाड्यांवर जरी परिणाम झाला असला तरीही लोकलच्या वेळापत्रकावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाल्याचं यावेळी मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. दिवा ते पनवेल या मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक देखील सुरळीच सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच लवकरच डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रेल्वे या नियोजित वेळेमध्येच स्थानकावरुन सुटणार आहेत. पण अप मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल, असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.
हेही वाचा :
Palghar News : डबे सुटले, इंजिन पळालं अन् प्रवासी घाबरले; वैतरणा स्थानकातील धक्कादायक प्रकार