Thane Vaccination : कोरोना लसीऐवजी रेबिजचं इंजेक्शन, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; डॉक्टर, परिचारिका निलंबित
Thane Vaccination : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील एका आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला कोरोना (Corona) ऐवजी रेबीजची लस देण्यात आली. यापूर्वीही ठाणे महापालिकेत लसीकरणाबाबत हलगर्जीपणा दिसून आला आहे.
Thane Vaccination : खोटं आयकार्ड देऊन लस देणं, एकाच महिलेला 3 वेळा लस देणं अशा संतापजनक प्रकरणानंतर देखील ठाणे महापालिकेतील असे प्रकार थांबत नाही. कारण काल (मंगळवारी) पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पालिकेच्या कळव्यातील आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.
ठाणे महानगर पालिका कळव्यातील आतकोनेईश्वर विभागात एक आरोग्य केंद्र चालवते. याच केंद्रामध्ये कोरोनाचं लसीकरण देखील सुरु असल्यानं, एक व्यक्ती कोरोना लस घेण्यासाठी 27 तारखेला गेली होती. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी त्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून त्याला लस घेण्यासाठी परिचारिकेकडे पाठवलं. मात्र परिचारिकेनं त्या व्यक्तीकडे असलेल्या कागदपत्राची पडताळणी न करताच त्याला थेट रेबीजचं इंजेक्शन देऊन टाकलं. ही गंभीर बाब काही वेळानंतर सर्वांच्या लक्षात आली. महापौर नरेश म्हस्के यांना हे प्रकरण समजताच त्यांनी काल ठाणे महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागातील आणि पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर महापौरांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेनं ताबडतोब कारवाई करत या दोघींना निलंबित केलं आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
जेव्हापासून लसीकरण सुरु झालं आहे तेव्हापासून ठाणे महापालिका क्षेत्रात घडलेली ती तिसरी धक्कादायक घटना आहे. याआधी पालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात खोटं ओळखपत्र बनवून 21 जणांना लस देण्यात आली होती. यात एका अभिनेत्रीचा देखील समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या एका आरोग्य केंद्रात एका महिलेला तीन वेळा लस देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच लस न घेताच एका व्यक्तीला लस घेतल्याचा एसएमएस देखील आल्याची घटना ठाणे पालिकेच्या आरोग्य केंद्र घडली होती. या सर्व धक्कादायक प्रकरणांच्या मालिकांमध्ये काल घडलेल्या प्रकाराची भर पडली आहे. त्यामुळे पालिकेला पुन्हा एकदा टीकेचं धनी व्हावं लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :