एक्स्प्लोर
चार वर्षीय चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात नराधमाला एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा
चार वर्षीय चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा एका वर्षाच्या आत निकाल लागला आहे. या प्रकरणी नराधमाला ठाणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मोहमद आबेद मोहमद आजमीर शेख (20)असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई : चार वर्षीय चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा एका वर्षाच्या आत निकाल लागला आहे. या प्रकरणी नराधमाला ठाणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मोहमद आबेद मोहमद आजमीर शेख (20)असे आरोपीचे नाव आहे. 4 एप्रिल 2018 रोजी एका चार वर्षीय चिमुरडीचा दोन्ही हात नसलेल्या मृतदेह भिवंडीतील रोशन बाग परिसरातील आढळल्याने खळबळ उडाली होती. भोईवाडा पोलिसांनी 72 तासांच्या आत हत्येचा उलगडा केला. उधारीचे पैसे वसुलीच्या वादातून त्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली त्या नराधमाने पोलिसांना दिली होती. हा नराधम पीडित मुलीच्या शेजारीच राहणारा असून तो बलात्कार आणि खून करुन बिहारमध्ये पळून गेला होता. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाले होते. पोलिसांनी आरोपीला बिहारच्या गणेशपूर गावात सापळा रचून पकडले होते. मृत मुलगी भिवंडीतल्या एका चाळीत आपल्या नातेवाईकांसह राहत होती. चाळीजवळच तिच्या वडिलांची पानटपरी आहे. या पानटपरीवर आरोपी आबेद हा उधारीने पान, बिडी घेत असे, परंतु काही महिन्यांपासून त्याने उधारीचे 1 हजार 500 रुपये बाकी ठेवले होते. यावरून मृत मुलीच्या वडिलांनी आबेदकडे उधारीच्या पैशांची मागणी केली. उधारीच्या पैशांची मागणी केल्यानंतर आबेदने पान टपरीवर जाणे बंद केले. आबेद आपले 1 हजार 500 रुपये बुडवणार अशी शंका पान टपरीवाल्याला (मृत मुलीच्या वडिलांना)आली. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी आबेदला मारहाण केली होती. पान टपरलीवाल्याने केलेल्या मारहाणीचा राग मनात धरुन आबेदने 1 एप्रिल रोजी घरासमोरच्या मैदानात खेळणाऱ्या पान टपरीवाल्याच्या चार वर्षीय मुलीचे अपहरण केले. 2 एप्रील रोजी पानटपरीवाल्याने मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर भिवंडीतल्या रोशन बाग परिसरात त्या चार वर्षांच्या मुलीचा दोन्ही हात नसलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. मोहम्मद आबेदवर भोईवाडा पोलीस ठाण्यात कलम 363, कलम 364, कलम 366(अ ), कलम 376, कलम 302, आणि कलम 201 सह पॉक्सो कायदा कलम 4, 8, 9(ह ),10 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
आणखी वाचा























