कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी तात्पुरते कोविड सेंटर, टाटा रुग्णालयाचा पुढाकार; हजारो रुग्णांना फायदा होणार
रुग्णालयाने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या रुग्णालयात थर्मल स्कँनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास याठिकाणी रुग्णांना दाखल करून देखील घेण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध टाटा रुग्णालयाने कर्करोग रुग्णांसाठी तात्पुरते कोविड सेंटर सेंट झेव्हियर्स ग्राउंडवर उभारल आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून देशभरातून टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोनाशी संबधित लक्षणं आढळल्यास तपासणी होणार आहे. यासोबतच याठिकाणी 50 बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फायदा रुग्णालयात कोरोनाशी संबधित रुग्ण आढळल्यास त्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी होणार आहे.
याबाबत बोलताना कॅन्सर विभागाचे प्रमुख शैलेश श्रीखंडे म्हणाले की, कोरोनाचे संकट कधीपर्यंत संपेल याबाबत अंदाज वर्तवने अद्याप शक्य नाही. शिवाय कोरोना रुग्णांना चाचणीशिवाय ओळखने देखील अशक्य आहे. रुग्णालयातील गर्दी आणि रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी कर्करोगावर उपचार करणाऱ्या टाटा रुग्णालयाने तात्पुरत्या स्वरूपाची कोव्हिड ओपीडी सुरु केली आहे. ही ओपीडी सेंट झेव्हियर्स मैदानात करण्यात आली आहे. पिवळ्या, चंदेरी आणि लाल रंगात या ओपीडी बनवण्यात आल्या आहेत. यामध्ये स्क्रिनिंग तपासण्या, रुग्ण उपचार आणि व्यवस्थापन विभाग आहेत. सध्या संपूर्ण देशातून कर्करोगाशी संबंधित रुग्ण येतं आहेत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची स्कँनिंग किंवा प्राथमिक तपासणी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. यामध्ये कोरोना बाधित रुग्ण देखील असण्याची शक्यता आहे. यामध्ये लक्षणे नसलेले परंतू संशयित रुग्ण आल्यास तपासणीस वेळ लागतं आहे. त्यामुळे रुग्णांच्या अडचणी आणि अन्य रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी टाटा रुग्णालयाने हा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
रुग्णालयाने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या रुग्णालयात थर्मल स्कँनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास याठिकाणी रुग्णांना दाखल करून देखील घेण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या या सेंटरचा उपयोग पावसाळ्यात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नक्की होणार आहे. टाटा मेमोरियल सेंटरने मार्च 2020 मध्ये कोविड रुग्णांसाठी कोविड केंद्र सुरु केले आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत 1000 कोविड रुग्णांवर रुग्णालयाने उपचार केले आहेत.
मुंबईच्या अनेक रुग्णांलयांमधील रुग्णांची गरज भागवण्यासाठी टाटा मेमोरियल ट्रस्टने 2 कँसर वॉर्डचे कोव्हिड वॉर्डमध्ये रूपांतर केले आहे. आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे कोव्हिड सेंटर तयार केले आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनावरील ताण कमी होणार आहे. या रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांसोबत नर्स देखील याठिकाणी काम करणार आहेत. लवकरच हे सेंटर सुरु होईल. याठिकाणी गरज पडल्यास आणखी बेड वाढवण्यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरु आहेत.