पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या; पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप
नालासोपाऱ्यात पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे 19 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.
नालासोपारा : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेनं संपूर्ण देश ढवळून निघत असताना, नालासोपारात पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे एका 19 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. लग्नाचं आमिष दाखवून, अत्याचार केलेल्या आपल्या प्रियकरावर तिने संघर्ष करून, बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर तिच्यासोबत पोलीस आणि परिसरातील काही तरुणांनी केलेल्या गैरवर्तुणीकीमुळे तिने आपलं जिवनचं संपवल्याचं आई-वडिलांनी आरोप केला आहे. दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पीडितेच्या आईने मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नालासोपारा परिसरातील 19 वर्षीय पीडित मुलीने काल (2 ऑक्टोबर) घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. पोलीस आणि परिसरातील काही टवाळ तरुणांच्या असभ्य वर्तणुकीला कंटाळून तिनं आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. पोलिसांच्या खालच्या भाषेतील शब्दाला ती मुलगी अशरशः कंटाळली होती. पीडित मुलीचं सुनील माने या मुलाबरोबर प्रेम होतं. लग्नाचं आमिष देवून, सुनलीनं पीडित मुलीला 14 ऑगस्ट 2020 ला घरातून पळवून नेलं होतं. मात्र, आई वडिलांनी मिसिंगचा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी मुलीला पुन्हा आई वडिलांच्या स्वाधिन केलं. मात्र, सुनीलने लग्नाचं वचन त्या मुलीला दिलं. गावातून लग्नासाठी डॉक्युमेंट आणतो म्हणून, सुनील पसार झाला तो आलाच नाही.
पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून; पाच-सहा जणांचा धारदार शस्त्रांनी हल्ला
पीडित मुलीने हताश होवून, आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार 15 सप्टेंबरला सुनील माने याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात दिली. ही तक्रार दाखल करण्यासही पीडित मुलीला अनेक समस्येला सामोरं जावं लागलं. पोलीस तक्रार घेतच नव्हते. एका समाजसेवकाने पोलिसांना सांगितल्यानंतर चार दिवासांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तिला असभ्य शब्दात विचारणा केली. घाणेरडी भाषा वापरली. महिला पोलिसांनी विचारण्याचं सोडून पुरुष पोलीस विचारत होते. त्यातच शेजारील तरुण मुलं ही तिला चिडवत होती. पोलिसांना सांगूनही पोलीस तिलाच घाणेरड्या भाषेत ओरडत होते. शेवटी सर्व गोष्टीने हताश होवून, तिने काल रात्री आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस आणि शेजारी तरुणांमुळं तीने आत्महत्या केल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. मरण्यापूर्वी तिने दोन सुसाईड नोटही लिहल्या आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दोषींवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेहावर अंतिमसंस्कार न करण्याचं पाऊल नातेवाईकांनी उचललं आहे.