विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे : वर्षा गायकवाड
विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. हे करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
![विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे : वर्षा गायकवाड Student's health and safety are the highest priority says Minister Varsha Gaikwad विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे : वर्षा गायकवाड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/20/8871bd2779498f4fdff8d57dd30ab6e7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरूवात झाली. विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर आज लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा देखील आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. आता 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने सर्व शाळांनी नियोजन करून या वयोगटातील विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसेल तर त्यांनीही तातडीने लस घ्यावी असे गायकवाड म्हणाल्या. शाळांमध्ये कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून गर्दीचे उपक्रम टाळावेत. शाळेमधील गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी. प्रात्यक्षिके गर्दी टाळून घ्यावीत असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. विद्यार्थी अथवा शिक्षक, कर्मचारी कोविड संक्रमित झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन वर्ग अथवा शाळा गरजेनुसार बंद ठेवावी, असेही गायकवाड यांनी सांगितले.
लसीकरणाच्या मुद्याबाबत बोलताना शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, की विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच लसीकरण होत असल्याने शाळांनी गर्दी टाळून योग्य नियोजन करावे. विद्यार्थी अथवा शिक्षक कोविड संक्रमित झाल्यास ती वर्गखोली सॅनिटाईज करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 तारखेपर्यंत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभाग दक्ष आहे. राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 65 लाख 23 हजार 911 इतकी असून, सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
Beed Corona : सकारात्मक बातमी! बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आज शुन्यावर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)