मराठा आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा
मराठा समाजाच्या आंदोलनात समाजकंटक घुसल्याच्या दावा ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी 20 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : मराठा समाजाच्या आंदोलनात समाजकंटकांनी घुसून आंदोलन पेटवल्याचा दावा ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी 20 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
याशिवाय आणखी काही संशयीतांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आंदोलन पेटवल्याच्या प्रयत्न केल्याबद्दल या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिवसभर पोलिसांना सहकार्य करत आंदोलन शांततेच्या मार्गानं केलं. दुपारनंतर मुंबई बंद स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतर काही समाजकटंकांनी तोडफोड करण्यात सुरुवात केली, तसेच पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केलं.
त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तसेच आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 समाजकटंकांना अटक केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली.
नवी मुंबई ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण
मराठा मोर्चा समन्वयकांनी मुंबईत आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर तिकडे नवी मुंबई आणि ठाण्यात आंदोलक आक्रमक दिसत होते. नवी मुंबईतल्या कळंबोलीत आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाड्यांना आग लावली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे मुंबई-पुणे महामार्ग जवळपास 6 तास दोन्ही बाजूनं बंद आहे.
मराठा आंदोलनात अनोळखी चेहरे घुसल्याचा संशय- नरेंद्र पाटील
नवी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही अनोळखी चेहरे घुसल्याची शंका मराठा नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना पाटील यांनी या आंदोलनात उपरे आंदोलक घुसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आंदोलन पेटवण्यासाठी भाडोत्री माणसे पाठवली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. ठरल्याप्रमाणे एकदिवसीय बंद जाहीर करण्यात आला होता. बंद यशस्वी झाला, त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला वेळ द्यायला हवा असं आवाहन त्यांना आंदोलनकर्त्यांना केलं. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका आंदोलनातील नवीन चेहऱ्यांनी घेतली, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
सरकार मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण नाराज असून ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असंही आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.