1993 च्या मुंबई दंगलीदरम्यान स्थापन झालेल्या जे जे मार्ग पोलीस स्टेशनला 27 वर्ष पूर्ण!
मुंबईतील जे जे मार्ग पोलीस स्टेशनला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1993 च्या मुंबई दंगलीत सर्वाधिक पेटलेल्या भागात नियंत्रण मिळवण्यासाठी या पोलीस स्टेशनची स्थापना केली होती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी याच पोलीस स्टेशनमध्ये होते. मात्र कमी मनुष्यबळातही हद्दीत पोलिसांचा जागता पहारा होता.
मुंबई : 1993 मध्ये मुंबईत दंगली झाली तेव्हा सर्वात पेटलेला भाग होता तो भेंडीबाजार, भायखळा, डोंगरी आणि त्याच्या आसपासचा परिसर. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर जे जे मार्ग पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. या पोलीस स्टेशनने परिस्थितीत तर हाताळलीच शिवाय जीवितहानी आणि वित्तहानी देखील कमी करण्यात यश मिळवलं. याच जेजे पोलीस स्टेशनला शुक्रवारी (11 सप्टेंबर) 27 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनचा स्थापना दिवस साजरा केला. सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी, तसंच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या उपस्थितीत हा स्थापना दिवस पार पडला.
जे जे मार्ग पोलीस स्टेशन आठ किलोमीटरच्या परिसराचा जागता पहारा देतं. मध्यमवर्गीय कुटुंब आणि छोटे उद्योजक असा संमिश्र भाग असलेला हा परिसर आहे. मुस्लीम समुदायाची संख्या या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. 1993 दंगलीत जेव्हा मुंबई पेटली होती आणि याचा सर्वात मोठा फटका या परिसराला बसत होता. त्यावेळी जे जे पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. पोलीस स्टेशन नवीन होतं मात्र जिद्द तीच आजूबाजूला वातावरण पेटलेलं असताना सुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता त्यावेळी या पोलिस कर्मचाऱ्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं.
या पोलीस स्टेशनला यंदा 27 वर्ष पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या कोरोना प्रादुर्भावाचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्रामध्ये जर कुठल्या पोलीस स्टेशनला बसला असेल तर ते जेजे मार्ग पोलीस स्टेशन. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी याच पोलीस स्टेशनमध्ये होते. जे जे मार्ग पोलीस स्टेशनचे 60 कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते आणि सर्व कोरोनावर मात करुन कामावर रुजू झाले आहेत. मुंबई पोलीस उपआयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सुद्धा वेळोवेळी या पोलिस स्टेशनला भेट देऊन आणि जातीने लक्ष घालून या कर्मचाऱ्यांचा मनोधैर्य वाढवत राहिले.
महाराष्ट्र सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले तर 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना ज्यांना काही पूर्व आजार आहेत त्यांना सुद्धा सुट्टीची मुभा दिली. मात्र आधीच कोरोनाने ग्रासलेल्या या पोलीस स्टेशनला कमी मनुष्यबळाचा सुद्धा सामना करावा लागत होतं. मात्र अशा परिस्थितीतही जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोख पहारा ठेवला आणि लोकांना विनाकारण घरा बाहेर पडण्यापासून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पसरण्यापासून थांबवण्यात यश आलं.