आयकर विभागाच्या धाडीत धक्कादायक माहिती उघड! हजार कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार
आयकर विभागाने राज्यात मारलेल्या धाडीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात हजार कोटींच्यावर व्यवहार आढळून आले आहे.
मुंबई : आयकर विभागाने एक सर्च ऑपरेशन 23 सप्टेंबर 2021 रोजी राबविले. यात महाराष्ट्रातील काही व्यवसायिक, दलाल आणि उच्च पदांवर असलेले जनसेवक यांचा समावेश होता. सुमारे 6 महिने प्राप्त होत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर या धाडी टाकण्यात आल्या. 25 निवासी आणि 15 कार्यालय परिसरांवर या धाडी टाकण्यात आल्या. 4 कार्यालयांचा सुद्धा यात समावेश होता. हॉटेल ओबेरॉयमध्ये कायमस्वरूपी बुक करण्यात आलेले काही सुट सुद्धा यात समाविष्ट आहेत. दोन दलाल याठिकाणी सातत्याने ग्राहकांना भेटत होते. यात अनेक कोड वापरून नोंदी असून एक केसमध्ये तर 10 वर्ष जुनी नोंद आहे. यात जे व्यवहार आढळून आले ते 1050 कोटी रूपयांचे आहेत.
हे दलाल जागा देण्यापासून ते सर्व शासकीय परवानग्यांपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा पुरवत. यासाठी संवादाचे इनक्रिप्टीटेड मोड वापरण्यात आले असले तरी आयकर विभागाने अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे प्राप्त केले आहेत. अनेक छुप्या जागा जेथे याचे पुरावे होते, त्याही शोधून काढल्या आहेत. कॅश हाताळण्यासाठी आंगडिया सेवा सुद्धा वापरण्यात आली असून, एका आंगडियाकडून दीड कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत.
कोणत्या खात्यात किती पैसे आले, किती यायचे आहेत, याची संपूर्ण समरी प्राप्त झाली असून, 200 कोटींचे एकेक व्यवहार आहेत. यातील प्रमुख व्यवहार हे महत्त्वाच्या खात्यांमध्ये पोस्टिंगसाठी अधिकार्यांनी दिलेले कॅशमधील पैसे आहेत. कंत्राटदारांनी बिले काढण्यासाठी दिलेले पैसेही आहेत. कोडनेम असलेल्या व्यक्तींना ते देण्यात आले आहेत. एका दलालाने तर शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली असून, ती बड्या कॉर्पोरेटला दिली आहे. अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी, त्यांचे नातेवाईक, महत्त्वाचे व्यक्ती यांनी या स्किममध्ये गुंतवणूक केली आहे.
काही विशिष्ट तारखांना 40 कोटी, 27 कोटी असे रोखीने व्यवहार झाल्याचे आढळून आले असून, एका कोडनेम असलेल्या व्यक्तीला 23 कोटी रूपये रोखीने देण्यात आले आहेत. शासकीय योजनांमध्ये जमीन, निविदांना मुदतवाढ, माईनिंग कंत्राट इत्यादींसाठी या दलालाने मोठी आर्थिक उलाढाल केल्याचेही निष्पन्न झाले आहे. एका प्रकारणात 16 कोटी रूपये रोखीने प्राप्त झाल्याचे व्हॉटसअॅप चॅटमध्ये निष्पन्न झाले आहे. यात काही बांधकाम व्यवसायी, बिल्डर्सचा समावेश आहे. मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, आयक्लाऊड, ईमेल इत्यादी माध्यमांतून मोठा डिजिटल पुरावा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत 4.6 कोटी रूपये रोख, 3.42 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. 4 लॉकर्स सील करण्यात आले असून, पुढील तपास केला जात आहे.