Uddhav Thackeray : मुलं पळवणारी टोळी ऐकली, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद महाराष्ट्रात फिरतेय,दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार: उद्धव ठाकरे
Shivsena : दसरा हा शिवतीर्थावरच होणार असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
मुंबई: आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असाही ठाम विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतात. ते मिंधे गटात गेले नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय?
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आज जहरी टीका केली. ते म्हणाले की, "मुंबईवर आज गिधाडं फिरत आहेत. निवडणुका आल्यावरच यांना मुंबईची आठवण येते. अमित शाह हे त्यापैकीच एक. शिवसेनेला त्यांनी आस्मान दाखवणार असल्याचं सांगितलं. पण आम्ही त्यांना आस्मान दाखवणार आहोत. ही शिवसेना मराठी माणसाच्या बलिदानातून मिळाली आहे. यांना ही हातात घेऊन विकायची आहे."
शिवसेना म्हणजे विश्वास आहे, एक आधार आहे, म्हणून शिवसेनेवर मुंबईकर विश्वास ठेवतात. मुंबईवर ज्या ज्या वेळी संकटं आली त्या त्या वेळी शिवसैनिक धावून गेले होते असंही ते म्हणाले.
धारावीत आर्थिक केंद्र व्हायला हवं होतं, पण ते गुजरातला पळवण्यात आलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला नेले जातात. प्रकल्प गुजरातला न्यायचे आणि नंतर त्याला भरभरून आर्थिक मदत द्यायची. वेदांता महाराष्ट्रात येण्यासाठी केंद्राने सवलत का दिली नाही? दिल्लीत जाता तर मग पंतप्रधानांना ठणकावून का विचारत नाही?"
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबई जिंकांयचं म्हणजे नेमकं काय? मुंबई जिंकायची म्हणजे पहिला मुंबईकरांची मनं जिंकावी लागतात, ती शिवसेनेने जिंकली आहेत. मुंबईकरांच्या सुखदुखात शिवसेनेने सहभाग घेतला. भाजपला बदल करायचा आहे, मुंबई दिल्लीकरांच्या पायी घालायची आहे. पण ही मुंबई छत्रपती शिवरायांची आहे, ती झुकणार नाही."
शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आजच्या मेळाव्याला आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर गटप्रमुखांचा हा पहिल्यांदाच मेळावा होत आहे.