स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करेल, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका
आजचे आयाराम हे उद्या गयाराम होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडणारे जी कारणे देत आहेत तो राजकीय विनोद ठरावा. विचारांचा येथे काडीमात्र संबंध नाही. हे सर्वच स्तरांवर सुरू आहे.
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आयारामांचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कान टोचले. 'सामना'च्या रोखठोक या सदरात 'स्वर्ग बदलण्याची स्पर्धा' या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध केला आहे. देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षाचं महत्त्व कमी करुन चालणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही ही भूमिका मांडली आहे, त्यामुळे मी देखील तशीची भूमिका मांडली आहे. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष बेफामपणे वागतो. त्यामुळे त्या देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होते. भारताला अशी राज्यव्यवस्था परवडणारी नाही. महाराष्ट्रात युतीचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र प्रबळ सत्ताधाऱ्यांसमोर प्रबळ विरोधीपक्षही हवा, असं मत संजय राऊत यांनी मांडलं.
रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी काय म्हटलं?
महाराष्ट्रात आणि देशात पक्षांतराची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष उरेल काय, हा प्रश्न आता पडतो. काँग्रेस व राष्ट्रवादी हा ज्यांच्यासाठी कालपर्यंत स्वर्ग होता ते सगळे नव्या स्वर्गाच्या दारात रांग लावून उभे आहेत. स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करील.सध्या जो उठतोय तो भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी राजकारणात अस्पृश्य ठरलेले हे पक्ष. आज या दोन्ही पक्षांच्या बाहेर लोक रांगा लावून उभे आहेत. जे रांगेत आहेत यापैकी काही लोकांनी अनेकदा पक्ष सोडला आहे. त्यामुळे आजचे आयाराम हे उद्या गयाराम होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडणारे जी कारणे देत आहेत तो राजकीय विनोद ठरावा. विचारांचा येथे काडीमात्र संबंध नाही. हे सर्वच स्तरांवर सुरू आहे.
दिल्लीत म्हणजे लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही व महाराष्ट्रातही तो ठेवायचा नाही हे काही मंडळींनी ठरवले असेल तर देशाचे अस्तित्व आणि लोकशाहीला ते मारक ठरेल. महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ असे आहेत की, तेथे काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळतील काय, असा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षात असताना जे कमवले ते सर्व डबोले घेऊन लोक पक्षांतर करत आहेत. पक्षांतर करणाऱ्यांचे वैशिष्ट्य असे की, ते जुन्या दैवतांना स्मरून पक्ष सोडीत आहेत. शिवसेनेतून भुजबळ, राणे, कोळंबकर वगैरेंनी पक्ष सोडला तेव्हा बाळासाहेब ठाकरे हेच आपले दैवत असल्याचे ते सांगत राहिले. आता पद्मसिंह पाटील, अकोल्याचे पिचड, सोलापूरचे दीपक साळुंखे, बार्शीचे सोपल वगैरे मंडळींनी शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे सांगून पक्ष बदलला. यापैकी प्रत्येकाने शिवसेना-भाजपवर टीका केली आहे.
कोकणातून भास्कर जाधव हेसुद्धा शिवसेनेत परतले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकून येण्याची पाच टक्के जरी खात्री असती तरी यापैकी कुणीच भाजप-शिवसेनेत सरकले नसते व 370 कलमाचे कारण देऊन पक्षांतर केले नसते. 370 कलमाच्या संदर्भात काँग्रेसमध्ये असताना यापैकी कुणीच बोलले नव्हते. एकदा खिडकी उघडली की, हवेबरोबर कीटकही आत येतात. येथे तर स्वर्गाचे सर्व दरवाजेच उघडून ठेवले आहेत. पाण्याचा योग्य वेळी विसर्ग केला नाही तर काय होते ते सांगली, कोल्हापूरच्या महापुराने दाखवून दिले. विसर्गाचे पाणी ज्यांच्या घरात शिरले त्यांनी सावध राहावे!