(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वादग्रस्त पुस्तकावरुन सामनातून भाजपला टोला, तर पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं
'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन शिवसेनेनं महाराष्ट्र भाजपावर थेट निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? असं म्हणत सामनातून भाजपवर टिका करण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आले होते. आजच्या सामना अग्रलेखातून वादग्रस्त पुस्तकावर टीका करताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. गोयलशी संबंध नाही, असं भाजपचे नेते कसं बोलू शकतात? पक्ष कार्यालयात ते पुस्तक प्रसिद्ध झाले आणि भाजप नेते त्यावेळी उपस्थित होते, असं सामनात म्हटलं गेलंय. पण त्याचवेळी मोदी देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांना तोड नाही पण तरी ते देशाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत काय? असा सवाल करत सामनातून मोदींवर स्तुतीसुमनं तर भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन शिवसेनेनं महाराष्ट्र भाजपावर थेट निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत अग्रलेखातून भाजपवर सडकून टिका करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : सामना अग्रलेखातून वादग्रस्त पुस्तकावर टीका
दरम्यान, आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरू झालेल्या वादावर भाजपने अखेर पडदा टाकला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले असून हा वाद आता संपला आहे, असं ट्विट करुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असंही प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
वादग्रस्त 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तक अखेर मागे; केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती
मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचं भाजप कार्यालयात प्रकाशन, शिवभक्तांमध्ये रोष
हिटलरवरही पुस्तक लिहिण्याचा जितेंद्र आव्हाडांचा सल्ला, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम