Sheetal Mhatre Viral Video: शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार; शंभूराज देसाई यांची घोषणा
Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्यातील व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना-शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी (SIT) गठीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.
शिवसेना-शिंदे गट आणि भाजपकडून जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन दहिसर परिसरात करण्यात आले होते. त्या दरम्यान एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याच रॅलीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती.
या घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विधिमंडळ अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या व्हायरल व्हिडीओचा आरोप ठाकरे यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी असल्याचा आरोप करण्यात आला. विधानसभेत या प्रकरणी झालेल्या चर्चेला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, दहिसर पूल हद्दीत हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्ते होते. यावेळी बाईक रॅली काढली होती. व्हिडीओतील संवाद चित्रीकरणामध्ये एडिटिंग करून फेसबुक माध्यमातून अपलोड करण्यात आला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.
व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पाच अटकेत
शीतल म्हात्रे यांनी पोलीस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींची धरपकड सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे युवा सेना कोअर टीमचे सदस्य साईनाथ दुर्गे आणि 'मातोश्री' फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.