(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंच्या भूमिकेने शिवसेनेची अडचण?
भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना वाढता पाठिंबा लक्षात घेता अनेक नेत्यांमध्ये आपले कार्यकर्ते आणि मतदारांना रोखण्याचं आव्हान आहे. खासकरुन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये भूमिकेवरुन कुजबुज सुरु आहे
मुंबई : मशिदींवरील भोंग्याचं अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलंय खरं पण खरी अडचण आता शिवसेनेची होताना दिसत आहे. कारण मशिदीवरचे भोंगे काढण्याच्या अल्टिमेटमला सर्वच स्तरावरुन पाठिंबा वाढत चालला आहे. जैन, गुजराती, मारवाडी उत्तर भारतीय स्वागत करत आहेत एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातला मराठी माणूसही हळूहळू राज ठाकरेंच्या पाठिशी उभा राहताना दिसत आहे. याचाच मराठी आणि हिंदुत्त्वाचा झेंडा घेऊन चालणाऱ्या शिवसेनेवर दबाव वाढत चालला आहे
राज ठाकरे नेहमीच मराठीच्या मुद्द्यांवर राजकारण करत आले आहेत.आता हिंदुत्वाचा मुद्दा शेवटी मराठी काय आणि हिंदुत्व काय? मतं शिवसेनेची विभागली जातात. त्यामुळे आपली मतांमध्ये पुन्हा फाटाफूट होणार अशी कुजबुज शिवसेनेत सुरु आहे.
स्थानिक पातळीवर लोक राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जावी, अशी कुजबुज शिवसेना नेत्यांमध्ये आहे. त्यात राज ठाकरेंनी मागच्या सभेत एकही शब्द उद्धव ठाकरेंच्या विरोधात उच्चारला नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर असलेल्या शिवसैनिकांची अडचण होत आहे.
मुंबई महानगरपालिकेसह अनेक जिल्ह्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. मनसे आणि भाजप युतीबाबत अद्याप स्पष्टता नाही पण याच मुद्द्यांवर मनसे कायम राहिल्यास शिवसेनेच्या मतात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2017 च्या आकडेवारीनुसार भाजप आणि मनसे एकूण मतांच्या आकडेवारीनुसार
- शिवसेनेसमोर मनसे भाजपची मतं पकडून २१ पेक्षा जास्त जागांवर सर्वाधिक मतं घेतली आहे
- त्यात 2017 साली मनसेचे 7 नगरसेवक जिंकून आले होते
- काही जांगावर मनसे आणि भाजपने दोन नंबरची मतं जिंकली आहे
- भविष्यात असाच माहौल राहिला तर शिवसेनेसमोरचा धोका स्पष्टपणे दिसत आहे
भोंग्याच्या राजकारणाचे अनेक अंक महाराष्ट्राने पाहिले आहेत. महाआरतीला, पूजा पाठ आणि मनसैनिकांची बॅनरबाजीने राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्यामुळे भगवाधारी सैनिक मात्र सध्या शांत आहेत. आपल्या मतदारांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत पण तोही पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट पाहत आहे.
शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या पुढे ठाम भूमिका घ्या अशी नेत्यांनी सांगण्याची परंपरा नाही किंवा तशी कोण हिम्मतही करणार नाही. कार्यकर्त्यांच्या कुजबुजींचा आढावा उद्धव ठाकरे काही नेत्यांच्या माध्यमातून घेत असतात. त्यामुळे राज ठाकरेंच्या भोंग्याच्या प्लॅनला रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या डोक्यातही काहीतरी मास्टर प्लॅन तयार असणार पण तो वेळीच बाहेर आला तर ठीक नाहीतर तोपर्यंत बरंच पाणी पुलाखाली वाहून गेलेलं असेल.