बंटी-बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ देत, हा फिल्मवाल्यांचा स्टंट ; संजय राऊतांचं राणा दाम्पत्यावर टीकास्त्र
Shiv Sena MP Sanjay Raut : हनुमान चालिसा आणि रामजन्मोत्सव साजरा करणं हे धार्मिक आणि आस्थेचे विषय आहेत. पण याचा स्टंट केल्याची टीका नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut : मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणाऱ्या राणा दाम्पत्याचा शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंटी आणि बबली असा उल्लेख केला आहे. तसेच, हनुमान चालिसा आणि रामजन्मोत्सव साजरा करणं हे धार्मिक आणि आस्थेचे विषय आहेत. पण याचा स्टंट केल्याची टीका नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर संजय राऊत यांनी केली आहे. हिंदुत्ववादी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळं भाजपवर ही वेळ आली आहे. सरकार पाडण्यासाठी हे सगळे कारनामे सुरु असल्याचा पुर्नउच्चार शिवसैनिकांकडून वारंवार केला जात आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "कोणाला स्टंट करायचे असतील तर स्टंट करु द्या. या स्टंटनं काहीही फरक पडत नाही. शिवसैनिकांना अशा स्टंट्सचा अनुभव आहे. त्यांना मुंबईचं पाणी माहीत नाही अजून शिवसेनेचं काय आहे ते, करु द्यात. जे काही स्टंट करायचे आहेत ते. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालिसा वाचणं, रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकीचे आणि स्टंटचे विषय नाहीत. पण अलिकडे भाजपनं हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करुन ठेवला आहे. त्यातली ही सगळी पात्र आहेत. लोक यांना आणि त्यांच्या हिंदुत्वाला गांभीर्यानं घेत नाहीत. हनुमान चालिसा असेल, रामनवमी असेल, इतर सण-उत्सव असतील या महाराष्ट्रात, मुंबईत आम्ही सगळे साजरे करतो. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही मुंबई, शोभायात्रा, गुढीपाडव्यापासून दसऱ्यापर्यंत, रामजन्मोत्सव साजरा करतो. हे आम्हाला काय शिकवतायत?."
"बंटी आणि बबली जर पोहोचले असतील, तर आम्हाला काहीच हरकत नाही. ही स्टंटबाजी आहे, हे फिल्मी लोक आहे. स्टंटबाजी किंवा मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आता भाजपला अशा लोकांची गरज भासते आपल्या मार्केटिंगसाठी. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे हिंदुत्व काय आहे. रामजन्मोत्सव किंवा हनुमान चालिसा या स्टंट करण्याच्या गोष्टी नाहीत. या श्रद्धा, भावनेच्या गोष्टी आहेत. पण यांना स्टंटच करायच्या असतील, तर करु देत. आता त्यांना कळेल मुंबई काय आहे.", असं संजय राऊत म्हणाले.
"गुंगारे वैगरे काही नसतं. मुंबईचे पोलीस, शिवसैनिक हे फार सक्षम आहेत. स्टंट करायचं ज्यांनी ठरवलंय, त्याला काही कारण लागत नाही. भाजपला आता सध्या मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार्स, स्टंटबाज यांचा उपयोग करुन घेत आहेत. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही.", असं संजय राऊत म्हणाले.