Sanjay Raut Property Seize by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त
Sanjay Raut Property Seize by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. मुंबईतील कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
Sanjay Raut Property Seize by ED : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त केल्याची माहिती मिळत आहे. आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचलनालयानं (ED) शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. ईडीनं संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे.
मुंबईतील एक हजार 34 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आघाडीवर होतं, ते म्हणजे संजय राऊत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्यांना फैलावर घेतलं होतं. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, संजय राऊतांनी भाजप नेत्यांसोबतच थेट ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता.
ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार
संजय राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या खंडणी रॅकेटच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी SIT स्थापन केली आहे. ईडीचे (ED) अज्ञात अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याच्या आरोपांचा तपास करण्यासाठी आता SIT स्थापन करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचं नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू तपासाचे नेतृत्त्व करणार आहे. त्यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच संजय राऊतांनी जितेंद्र नवलानी यांच्यावरही आरोप केले होते. तेदेखील खंडणी वसुलीच्या कटात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या EOW विंगकडून केला जात होता. त्यावेळी EOW ने 7 लोकांचे जबाब नोंदवले होते आणि ज्या कंपन्यांच्या खात्यातील पैसे कथितरित्या गेले होते, त्या कंपन्यांशी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावलं होतं.