Seat Belt New Rule : सीटबेल्ट नियम मुंबईतील टॅक्सी संघटनांना अमान्य, नियमातून वगळण्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र
Seat Belt New Rule : काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी मागील आसनांवरील प्रवाशांना सीट बेल्ट सक्तीच्या नियमाला विरोध दर्शवत यातून टॅक्सीला वगळण्यात यावं, अशी मागणी वाहतूक पोलिसांना केली आहे.
Seat Belt New Rule : चारचाकी वाहनांमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना 1 नोव्हेंबरपासून सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. त्याविरोधात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी आपला विरोध दर्शवत या नियमातून टॅक्सीला (Taxi) वगळण्यात यावं, अशी मागणी वाहतूक पोलिसांना केली आहे. वाहतूक पोलिसांनी केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनात मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं आहे. मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर चालकावर 500 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याने मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने त्याला विरोध केला आहे.
मागील आसनांवरील प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक
आता कारच्या मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसंच सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी 1 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
परंतु काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी या नियमाला विरोध दर्शवत टॅक्सीला वगळण्याची मागणी केली आहे. "काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसंच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करु नये, असं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण हे शून्य आहे. शहरात वाहनाचा सरासरी वेग हा 12 किलोमीटरपेक्षाही कमी आहे. हे मुद्दे विचारात घेता मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करु नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
इतर महत्त्वाची बातमी