(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिल परबांवरील ईडी कारवाईवरुन संजय राऊतांचा संताप; म्हणाले, 'राजकारणाला गेल्या 55 वर्षात इतकं...'
Sanjay Raut On Anil Parab : ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Sanjay Raut On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल परबांची बाजू घेताना म्हटलं आहे की, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. याच प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत. त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहेत. परंतु त्यांच्यावर कोणी हात लावत नाही. आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, तुम्ही सुडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळालं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे त्यामुळे राज्यातील राजकीय विरोधकांना अशाप्रकारे नामोहरण करावं असं कुणाला वाटत असेल तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास सरकारचं मनोबल कमी होणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पाडू. सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायांमुळे भारतीय जनता पक्ष हा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतका वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळालं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे. आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना विरोधात असंख्य पुरावे आहेत. जितू नवलानीला कोणी पळवलं याचे उत्तर सुद्धा सबळ पुरावे असणाऱ्यांनी द्यावे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील आणि पश्चिम बंगालमध्येच केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. असं फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा. शिवसेनेला बदनाम करायचं महा विकास आघाडीला कोंडीत आणण्यासाठी या संपूर्णपणे कारवाया सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या कारवाया केल्या जात आहेत. परंतु आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही, असं ते म्हणाले.
विक्रांत घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो. मी सातत्याने घोटाळ्याचे पेपर दिल्लीला देत आहेत परंतु त्यावर साधं उत्तर येत नाही आहे, असंही ते म्हणाले. टॉयलेट घोटाळा अजून मोठा आहे. माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला म्हणून मी मागे येणार नाही. मी इतर काही प्रकरण पाठवली आहेत. परंतु ती फाइल उघडून पाहण्याची तसदी देखील कोणी घेत नाही. परंतु आम्ही देखील पाहून घेऊ, असंही ते म्हणाले.
राज्यसभा उमेदवारीवरुन बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत. मी स्वतः आणि कोल्हापूरचे संजय पवार. आज एक वाजता राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात अशी संपूर्ण महाविकास आघाडी एकीने उभी राहणार आहे, असंही ते म्हणाले.