Sanjay Raut: मी शिवसैनिक, जेलमध्ये अनेक कैद्यांना मदत केली...; संजय राऊतांनी कोणत्या कैद्यांना मदत केली?
Sanjay Raut Granted Bail: आर्थर रोड जेलमध्ये देशातील अनेक ख्यातनाम कैद्यांचा तसेच विविध गुन्ह्यांचा आरोप असलेल्या सेलिब्रेटींचा मुक्काम आहे.
मुंबई: तब्बल 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर आपण पुन्हा लढणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलंय. तसंच शिवसेनेचा कणा मोडला नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं ते म्हणाले. पण त्याचसोबत संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मी शिवसैनिक आहे, जेलमध्ये असताना अनेक कैद्यांना मदत केली असं संजय राऊत म्हणाले. आर्थर रोड तुरुंगात सर्व प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असताना संजय राऊत यांनी नेमकी कुणाला आणि कशी मदत केली असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
'मी जेलमध्ये असताना अनेक जणांना मदत केली. शिवसैनिक आहे, मदतीला येतो कुठेही' असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये असताना 8959 हा त्यांचा कैदी क्रमांक होता. तर त्यांच्यासाठी विशेष बराकीची सोय करण्यात आली होती. मग संजय राऊत यांनी मदत केलेल्यांमध्ये केवळ राजकीय कैदी आहेत की आणखी कोण हे मात्र गुलदस्त्यात राहिलं आहे.
आर्थर रोड जेलमधील प्रसिद्ध कैदी
मुंबईच्या आर्थर रोड जेलचं बांधकाम ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 1926 साली झालं. या जेलचं वैशिष्ट्य म्हणजे फेमस फिल्म स्टार, राजकारणी आणि मोठमोठे व्यावसायिक तसेच कुख्यात गँगस्टर या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत, किंवा त्यांच्यावर खटले सुरू असल्याने त्यांचा मुक्काम या जेलमध्ये आहेत. आर्यन खान, संजय दत्त, सलमान खान, राज कुंद्रा, छगन भुजबळ अशा काही सेलिब्रेटिंना या जेलमध्ये राहावं लागलं आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब हा देखील याच तुरुंगात होता.
अबू सालेम
मुंबईतील 1993 च्या बॉंबस्फोटातील आरोपींपैकी प्रमुख आरोपी असलेला अबू सालेम या ठिकाणी शिक्षा होता. नंतर त्याला तळोजा कारागृहात शिफ्ट करण्यात आलं.
छोटा राजन
छोटा राजन हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन. त्याला सुरुवातीला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. नतंर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
अरुण गवळी
मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी याला कमलाकर मर्डर केसमध्ये अटक करण्यात आली होती. सुरुवातीला अरूण गवळी याला आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात आलं होतं. नंतर त्याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
नवाब मलिक
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना जेलमध्ये राहावं लागलं आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मिळाला असला तरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अद्याप जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा मुक्काम सध्या याच जेलमध्ये आहे.
विजय मल्ल्या आणि नीरव मोदीच्या प्रतिक्षेत आर्थर रोड
भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून पळालेल्या विजय मल्ल्यासाठी 2018 सालीच विशेष बराक तयार करण्यात आली आहे. तसेच नीरव मोदीला भारतात आणल्यानंतर याच जेलमध्ये ठेवण्यातल येईल.