(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांचा अपमान विसरण्यासाठी षडयंत्र, बोम्मईचं जतबद्दल वक्तव्य भाजपाची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : बोम्मईंनी जतबद्दल केलेलं वक्तव्य भाजपाची स्क्रिप्ट असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. छत्रपती शिवरायांच्या अपमान विसरण्यासाठी हे भाजपचं षडयंत्र असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut on Basavaraj Bommai : शिवसेना ( Shivsena ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी जतबद्दल केलेलं वक्तव्य हे जनतेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) राज्यपालांनी केलेला अपमान विसरावा यासाठी केलेलं षडयंत्र आहे. भाजपची स्क्रिप्ट तयार असते, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं होतं. यानंतर सीमावाद पुन्हा एकदा चिघळल्याचं पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवरायांचा अपमान विसरण्यासाठी षडयंत्र
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. राज्यपालांनी शिवरायांचा केलेला अपमान जनतेने विसरावा आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवावं, यासाठी भाजपनं बोम्मई यांना पुढे केलं आणि त्यांनी जतबद्दल वक्तव्य केलं, असा आरोप राऊतांनी केला आहे.
राज्यपालांचं छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं होतं. ठिकठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलनंही करण्यात आली होती. या विषयावरून जनतेचं लक्ष विचलित व्हावं यासाठी बोम्मईंनी जतबद्दल वक्तव्य केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ : भाजपची स्क्रिप्ट नेहमी तयार असते, संजय राऊतांचा हल्लाबोल
सीमावादाचा प्रश्न चिघळला
महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकला देणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट सांगितलं. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Basavaraj Bommai) यांनी पुन्हा ट्वीट करत महाराष्ट्रातील अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करण्याबाबत ट्विट केलं. यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे.