(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Nirupam: राऊतांची स्मरणशक्ती क्षीण, संजय निरूपम यांचा हल्लाबोल; 2019 चा संदर्भ चालणार नाही, ठाकरे गटाला इशारा
शिवसेना जिंकली, काँग्रेस जिंकली म्हणजे इंडिया आघाडी जिंकली असं होत नाही त्यासाठी सगळ्या पक्षांना जिंकून आणायचं आहे, असे निरुपम यावेळी म्हणाले.
मुंबई : शिवसेनेकडे (Shiv Sena) किती ताकद आहे हे आपल्याला दिसतंय असा टोला काँग्रेस (Congress) नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी ठाकरे गटाला मारला आहे. दीड वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 2019 चा निकाल हा पॉईंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही असं देखील निरूपम यांनी सुनावलं आहे. तसेच राऊतांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) सुनावले आहे.
संजय निरूपम म्हणाले, शिवसेनाकडे किती ताकद आहे हे आपल्याला दिसतं आहे. दीड वर्षापूर्वी जी फूट त्यांच्यात पडली त्यानंतर एकही निवडणूक झाली नाही. शिवसेना किंवा राष्ट्रवादी शून्य झाली आाहे, असे मी असं म्हणत नाही. परंतु 2019 चा जो निकाल आहे तो पॉइंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही. तुम्ही आता 2019 चा निकाल पकडून ठेवू शकत नाही. तुम्हाला जर भाजपचा पराभव करायचा आहे तर आपापसात भांडू नका. तुम्हाला काँग्रेसला कमी लेखून चालणार नाही.
राऊतांची स्मरणशक्ती क्षीण : संजय निरुपम
संजय निरुपम कोण आहेत? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु असा टोला राऊतांनी यावेळी निरुपम यांना दिला. याला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले, मी कोण आहे याची समज संजय राऊतांपेक्षा जास्त चांगली कुणालाच नाही. बहुदा त्यांची स्मरणशक्ती क्षीण झाली आहे. जर तुमची आमच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू आहे तर तुम्ही पत्रकारांशी का बोलता? या सगळ्या चर्चेसाठी आमचे लोक त्यांच्या संपर्कात आहे.
शिवसेना जिंकली, काँग्रेस जिंकली म्हणजे इंडिया आघाडी जिंकली असं होत नाही : संजय निरुपम
आंबेडकरांनी जी 12-12-12 ची हिमालयासारखी अट दिली आहे त्याला काही अर्थ नाही. आमचे नेते अशोक चव्हाण त्यांच्या संपर्कात आहे. लोकसभेत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित यांच्यासोबत बसून आम्ही बोलणं करू. चांगली, निवडून येणारी सीट्स यासंदर्भात चर्चा करणार आहे. शिवसेना जिंकली, काँग्रेस जिंकली म्हणजे इंडिया आघाडी जिंकली असं होत नाही त्यासाठी सगळ्या पक्षांना जिंकून आणायचं आहे, असेही निरुपम यावेळी म्हणाले.
संजय राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेणं सोडलं पाहिजे : संजय निरुपम
संजय निरुपम म्हणाले, शिवसेना जर म्हणते आम्हाला मुंबईत 4-5 जागा हव्या तर मी म्हणतो सगळ्या सहा जागा घेऊन जा. काँग्रेसकडे मुंबईतल्या तीन ते चार जागा अशा आहेत ज्या आम्ही निवडून येऊ शकतो. संजय राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेणं सोडलं पाहिजे. भाजपासाठी संजय राऊत दर तासानी पत्रकार परिषद घ्यावी आणि बोलावं ना. आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी इंडिया आघाडीबद्दल जर असं काही बोललं तर त्याचा वाईट प्रचार होतो. निवडणुकीला आम्ही एकत्रित समोर जाणार आहे.