(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी, पुढील 48 तास मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम
Maharashtra Rain Update : राज्याच्या अनेक भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.
Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात अखेर मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. कोकणासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मागील 48 तासांत तळकोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला आहे. तसेच येत्या 48 तांसात महाराष्ट्रात काही भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने तो पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मागील 48 तासांत चांगला पाऊस झाल्याने मान्सूनची घोषणा
दरम्यान, मागील 48 तासांत रत्नागिरी, सिंधदुर्ग, कोल्हापूर परिसरात चांगला पाऊस झाल्याने आम्ही मान्सूनची घोषणा केली आहे. तसेच पुढील 48 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्र पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख सुनिल कांबळे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. जोपर्यंत 50 ते 60 मिमी म्हणजेच पेरणीलायक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीचा शेतकऱ्यांनी विचार करु नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.
विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली असली तरी, विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भासह मराठवाड्यात पुढील 7 ते 8 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
बिपरजॉयचा तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश
बिपरजॉय हे तीव्र चक्रीवादळ मुंबईच्या समांतर दिशेने पुढ सरकलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून 500 ते 600 किलोमीटर अंतरावरून पुढे जात आहे. या चक्रीवादळाने तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला असून हे गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला याचा फटका बसू शकतो.
राज्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. मुंबईत वाऱ्यांचा वेग 55 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका आहे. मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका असेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबई 3 ते 4 मिमी पाऊस झाला आहे. पुढील 48 तास वाऱ्यांची गती बघायला मिळेल. राज्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील.
पुढील 48 तासांत मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
मुंबईसह जवळच्या भागात आणि कोकणात पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मान्सून पुढील 48 तासांत मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. मुंबईसह कोकण आणि गोवा किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. यामुळे उंचच उंच लाटा दिसत आहेत. महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.