(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला! सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी
Biporjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला असून सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather Forecast : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका वाढत आहे. भारताच्या (India) गुजरात (Gujrat) किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy) धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाची वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे. याआधी हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला होता. पण चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत आहे, त्यामुळे हवामान विभागाने किनारपट्टी भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय उत्तरेकडे सरकलं
हवामान विभागाने आज दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर बिपरजॉय चक्रीवादळाला अत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हटलं आहे. हलामान विभागाने पुढे सांगितलं आहे की, 'पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गेल्या 6-तासांमध्ये 5 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं आहे. आज, 12 जून, 2023 रोजी चक्रीवादळ पूर्व मध्यभागी 0530 तास IST येथे केंद्रीत झालं. तसेच चक्रीवादळ लगतचा ईशान्य अरबी समुद्र अक्षांश 19.2°N आणि रेखांश 67.7°E जवळ, पोरबंदरपासून सुमारे 340 किमी नैऋत्येस, देवभूमी द्वारकेच्या 380 किमी नैऋत्येस, जाखाऊ बंदराच्या 460 किमी दक्षिणेस, 470 किमी दक्षिण-नैऋत्येस आणिनैऋत्येस 470 किमी अंतरावर कराची (पाकिस्तान) येथे होतं.
Cyclone Alert for Saurashtra & Kutch Coast: Orange Message. ESCS BIPARJPY at 0530IST of today over eastcentral & adjoining NE Arabian Sea near lat 19.2N & long 67.7E, about 380km SSW of Devbhumi Dwarka. To cross near Jakhau Port,Gujarat by noon of 15June. https://t.co/KLRdEFGKQj pic.twitter.com/bxn44UUVhD
— India Meteorological Department (@Indiametdept) June 12, 2023
चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं
बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. बिपरजॉय मांडवी ते कराची दरम्यान कुठे धडकणार अद्याप यासंदर्भात स्पष्टता नाही.
बिपरजॉय उत्तरेकडे सरकण्याची शक्यता
बिपरजॉय चक्रीवादळ 14 जूनला सकाळपर्यंत जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यानंतर चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकून 15 जूनच्या दुपारपर्यंत जखाऊ बंदर (गुजरात) जवळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानची सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतची पाकिस्तान किनारपट्टी पार करेल. यावेळी तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयमुळे वाऱ्याचा वेग 125-135 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे 'हे' सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता
दरम्यान, चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.