एक्स्प्लोर
उल्हासनगरात क्राईम ब्रँचच्या 'सेटिंग'चं कॉल रेकॉर्डिंग वायरल, तीन कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई
आता चौकशीत हे सेटिंगबाज पोलीस दोषी आढळतात का? आणि त्यांच्यावर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कल्याण : ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटचे तीन कर्मचारी सध्या चांगलेच गोत्यात आले आहेत. कारण सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सेटिंग करण्यावरुन या तिघांमध्ये वाद झाले, आणि याचं कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झालं आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहे.
उल्हासनगर शहरात गॅसचा मोठा काळाबाजार सुरु असल्याची बाब काही दिवसांपूर्वी ठाणे क्राईम ब्रँचने उघड केली होती. त्यानंतर या काळाबाजार करणाऱ्यांवर सातत्यानं कारवाई होणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र पोलिसांच्या 'सेटिंगबाजी'ला ऊत आल्याचं पाहायला मिळतं आहे.
काळाबाजार करणाऱ्या एकाला पकडल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना तो आपल्याला पैसे देत असल्याची बाब उल्हासनगर क्राईम ब्रँचमध्ये काम करणाऱ्या एका पोलीस हवालदारानेच कबूल केली आणि याचं कॉल रेकॉर्डिंग सध्या वायरल झालं आहे. उल्हासनगरच्या एचपी गॅस एजन्सीमध्ये काही वर्षांपूर्वी काम करत असलेला लक्ष्मण जाधव हा उल्हासनगर स्टेशन परिसरात गॅस सिलेंडरमधून गॅस चोरत असताना त्याला क्राईम ब्रँचचे कर्मचारी जावेद मुलानी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले यांनी पकडलं. यावेळी लक्ष्मण याने वाचण्यासाठी क्राईम ब्रँचमध्येच काम करणारे हवालदार भरत नवले यांना फोन केला आणि हा फोन जावेद मुलानी यांच्याकडे दिला. यानंतर या दोघांमध्ये जे काही संभाषण झालं, ते धक्कादायक होतं.
कधीकाळी लक्ष्मणच्याच सोबत काम करणारा त्याचा मित्र विलास शेळके यानेच हे कॉल रेकॉर्डिंग बाहेर आणत या प्रकाराला वाचा फोडली. या सगळ्यानंतर क्राईम ब्रँचच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं असतानाही त्यांना अभय देण्यात आलं. त्यामुळे उल्हासनगरमधील पत्रकार भरत तोलानी यांनी याबाबत तक्रार केली. मात्र तरीही काहीही फरक पडला नाही.
या सगळ्याबाबत उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना विचारलं असता त्यांनी हे कॉल रेकॉर्डिंग खोटं असल्याचा दावा केला आणि कॅमेरासमोर बोलायला साफ नकार दिला. तर दुसरीकडे स्वतः लक्ष्मण यानेच हे कॉल रेकॉर्डिंग खरं असून ते त्याचा मित्र विलास शेळके याने पसरवल्याचं मान्य केलं. लक्ष्मणचे परिचित आणि उल्हासनगर कोर्टात काम करणारे धर्मराज सांगळे यांच्याशी बोलताना लक्ष्मण याने ही गोष्ट मान्य केली, सोबतच आपण पोलिसांच्या बाजूने उभं राहणार असल्याचं विधानही त्याने केलं.
एकीकडे पोलीस हे सगळं खोटं असल्याचं सांगत असले, तरी हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले, हवालदार भरत नवले आणि पोलीस जावेद मुलानी यांची तडकाफडकी ठाणे कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशीही लावण्यात आली आहे. त्यामुळं आता चौकशीत हे सेटिंगबाज पोलीस दोषी आढळतात का? आणि त्यांच्यावर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement