रणजीतसिंह देओल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू
रणजीतसिंह देओल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच पदभार स्वीकारला आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार रणजीत सिंह देओल यांनी आज स्वीकारला. रणजीत सिंह देओल हे 1998 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचचे अधिकारी आहेत. रणजीत सिंह देओल आता सर्वात आव्हानात्मक कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-3 चे नेतृत्व करणार आहेत.
रणजीत सिंह देओल यांनी अश्विनी भिडे यांच्या कडून पदभार स्वीकारला. यावेळी दोघांनी एकमेकांना नवीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मेट्रो-3 सारख्या आव्हानात्मक प्रकल्पाच्या दृष्टीने रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती महत्त्वाची समजली जाते. मेट्रो-3 द्वारे उपनगरीय रेल्वेद्वारे जोडले न गेलेले महत्त्वाचे भाग तर जोडले जाणारच आहेत. शिवाय उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होऊन रोज रेल्वे अपघातमध्ये जाणारे हकनाक जीव देखील वाचणार आहेत.
रणजीत सिंह देओल यांना शासनाच्या वेगवेगळ्या पदांवर काम केल्याचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष असताना अपघात टाळण्यासाठी त्यांनी बस बांधणीसाठी माईल्ड स्टीलचा वापर करण्याची संकल्पना दिली होती. त्यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारकिर्दीदरम्यान व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम व प्रवासी माहिती यंत्रणा कार्यान्वित झाल्या. शिवशाही बसेस, स्मार्ट कार्ड्स, ई- तिकीटिंग तसेच संवेदनशील बस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
रणजीत सिंह देओल यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली असून मॅक्सवेल स्कूल ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, न्युयॉर्क येथून एक्झिक्युटिव्ह मास्टर्स इन पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन ही पदवी संपादन केली आहे. त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर कामे केली आहेत. त्यात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, संचालक (सेन्सॉर ऑपरेशन), रजिस्ट्रार जनरल (जनसंख्या विभाग, भारत), संचालक, समाज कल्याण विभाग, पुणे यांचा समावेश आहे.
अश्विनी भिडे यांना बढती
अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. आरे वसाहतीमधील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवत ठाकरे सरकारकडून अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना हटवून सक्षम अधिकाऱ्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु ही मागणी पूर्ण झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेची राज्यात सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, तर आदित्य ठाकरेदेखील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार भिडेंची बदली करेल, असा अंदाज अनेक जण वर्तवत होते.
IAS Officers Transferred | तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्या बदलीमागे सूडाचं राजकारण?