माझा कट्टा | संपूर्ण राम मंदिर निर्मितीसाठी जवळपास 1100 कोटींचा खर्च येण्याची शक्यता : गोविंद देव गिरी महाराज
संपूर्ण भारत देशातील आणि जगभरातील राम भक्त राम मंदिर निर्मितीत सहभागी व्हावे आणि त्यांनीही समाधान मिळावे, या उद्देशाने आम्ही निधी गोळा करुन राम मंदिराची निर्मिती करत आहोत, असं राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं.
मुंबई : राम मंदिराच्या निर्मितीच्या निधी संकलनाला आता सुरुवात झाली आहे. जनतेच्या सहभागातून राम मंदिर उभारण्याचा राम मंदिर न्यायासा मानस आहे. असा निधी कॉर्पोरेटद्वारे उभा करणे आम्हाला सहज शक्य होतं. तसेच काही कुटुंबांनी राम मंदिर आम्ही उभारतो असा प्रस्तावही आम्हाला दिला होता. मात्र एवढं महान कार्य कुणा एका कुटुंबाच्या हातून होणे आम्हाला रुचणारं नव्हतं. संपूर्ण भारत देशातील आणि जगभरातील राम भक्त राम मंदिर निर्मितीत सहभागी व्हावे आणि त्यांनाही समाधान मिळावे, या उद्देशाने आम्ही निधी गोळा करुन राम मंदिराची निर्मिती करत आहोत, असं राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं. ते आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
येत्या तीन-साडेतीन वर्षात राम मंदिर पूर्ण होईल
राम मंदिर निर्मितीसाठी देशातील सामान्य व्यक्तीलाही सहभागी होता यावं हा आमचा उद्देश आहे. राम मंदिरासाठी किती खर्च लागेल यासाठी न्यासाने अद्याप काहीही अंदाज सांगितलेला नाही. मात्र माझ्या अंदाजानुसार मुख्य राम मंदिरासाठी 300 ते 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर बाहेरील 70 एकर जागेवरील विकासासह हा खर्च 1100 कोटींच्या घरात जाईल. येत्या तीन ते साडेतीन वर्षात राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि राम भक्तांना ते दर्शनासाठी खुलं होईल, असा विश्वास स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला.
राम मंदिर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे आली त्यावेळी मला आश्चर्य वाटले. कारण माझा कोष आणि बांधकाम यांच्याशी काही संबध नाही, मात्र ही जबाबदारी माझ्याकडे चालून आली. हे मोठं आव्हान आहे, मात्र हे आव्हान मला पेलता येईल याची मला खात्री आहे म्हणून ते मी स्वीकारलं आहे, असं गोविंद देव गिरी महाराजांनी सांगितलं. सध्या काम करताना मला काहीही अडचणी येत नाहीयेत. मा्झ्या सोबत चार सीए काम करत आहेत. राम मंदिराचं काम करताना अनेक जण सोबत आहेत. या सर्वांना सोबत घेऊन काम करताना काही अडचणी येतील असं मला वाटतं नाही, असंही स्वामीजी म्हणाले.
आम्ही सहा लाख गावं आणि 15 कोटी लोकांपर्यंत पोहोचू
राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरु केला त्याळेळी आम्ही 4 लाख गावं आणि 11 कोटी लोकांपर्यंत पोहचू असा विचार केला होता. मात्र आता आम्ही सहा लाख गावं आणि 15 कोटी लोकांपर्यंत पोहचू असा आम्हाला विश्वास आहे. कारण हे काम करण्यासाठी आता आम्हाला विश्व हिंदू परिषदेकडून मदत मिळणार आहे. त्यांच्या कामावर आमचं लक्षही आहे, असंही गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं.