Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलू नका, सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका; राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश
Raj Thackeray Order to MNS Leaders : माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी मला विचारल्याशिवाय काही मत मांडू नये असा आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या वादावरुन मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. पक्षातील कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलू नये, सोशय मीडियावर व्यक्त होऊ नये असं फर्मान राज ठाकरेंनी काढलं आहे.
पक्षातील कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये, किंवा व्हिडीओ टाकू नये. प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू मांडण्यापूर्वी माझी परवानगी घ्यायची असा स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात मराठी आणि अमराठी असा वाद सुरू असून त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारांना या सूचना दिल्या आहेत.
Raj Thackeray Tweet : राज ठाकरेंचा आदेश काय?
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
राज ठाकरे मिरा रोडला भेट देण्याची शक्यता
राज ठाकरे लवकरच मीरा रोडला भेट देण्याची शक्यता आहे. मीरा रोडचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वात निघाला. त्या मोर्चामध्ये मराठींची एकजूट पाहायला मिळाली. तसंच अनेक मनसे नेत्यांना स्थानबद्धही करण्यात आलं होतं. या मोर्चा दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मीरारोडला भेट देण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि अमराठी हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. त्याचा प्रत्यय मीरारोडमध्ये पाहायला मिळाला. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या मनसेविरोधात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी 8 जुलै रोजी मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीनं विराट मोर्चा काढला.
शिंदेंच्या शिवसेनेत मतांतरं
दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून मीरारोडमध्ये निघालेल्या मोर्चाबाबत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सकाळच्या सत्रात मतमतांतरं पाहायला मिळाली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम स्पष्टीकरण देताना दिसले. तर मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का नाही असा जाब प्रताप सरनाईकांनी विचारला.
पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश
दरम्यान मीरा रोडच्या मोर्चाला परवानगी का नाकारली गेली यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना जाब विचारल्याचं समजतंय. परवानगी नाकारून पोलिसांना बदनाम करण्याचा हेतू होता का? याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
ही बातमी वाचा:























