Raj Tackeray Ayodhya Visit | मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्या दौरा करणार!
येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.9 मार्चनंतर महिन्याभर राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत श्रीराम प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. तर 9 मार्चनंतर महिन्याभराच्या काळात राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. मुंबईत आज (29 जानेवारी) झालेल्या बैठकीत पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
23 जानेवारी 2020 रोजी मनसेने आपला झेंडा बदलला, तो भगवा झाला. मनसेने हिंदुत्त्वाची कास धरली. पक्षाच्या झेंड्यातील बदल आणि मनसेची मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची स्वीकारलेली भूमिका यामुळे राज ठाकरे अयोध्या वारी करणार का असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते. या प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी पक्षाने सुरु केल्याचं समजतं. बाळा नांदगावकर यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत.
भाजप आणि मनसे एकत्र येणार का? अशीही चर्चा रंगली होती. मनसेने उत्तर भारतीयविरोधी भूमिका सौम्य केली तर आम्ही विचार करुन असं उत्तर भाजपच्या नेत्यांकडून मिळत होतं. त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे. राज ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला तर ते उत्तर भारतीयांजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा होऊ शकते.
9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. तर 9 मार्चनंतर महिनाभर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.
मराठी भाषा दिनाला मनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीम 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे. या निमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल. स्वत: राज ठाकरे मुंबई आणि ठाण्यात सही करण्यासाठी जातील. याशिवाय मनसेने मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत मनसेची सदस्य नोंदणी 9 मार्चच्या पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे संबोधन करतात. यंदा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत आपण मनसे सदस्य नोंदणी करणार आहोत. त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येईल, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करण्याची शक्यता