(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Mumbai Tour : राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठीची याचिका काँग्रेसकडून मागे
Rahul Gandhi Mumbai Tour : राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेसाठी काँग्रेसकडून हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. भाई जगताप यांच्याकडून याचिका बिनशर्त मागे घेण्यात आली होती.
Rahul Gandhi Mumbai Tour : राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठीची याचिका सुनावणी आधीच मागे घेण्यात आली. राज्य सरकारकडे ऑक्टोबर महिन्यांत यासाठीच्या परवानगीचं उत्तर न मिळाल्यानं मुंबई काँग्रेसनं सोमवारी हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेत असल्याचं कोर्टाला कळवलं. काँग्रेस (Congress) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याचिका मागे घेतली जावी हा काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांचा निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याचा अर्थ वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेताच हायकोर्टातही याचिका दाखल केली होती का?, असा सवाल इथं उपस्थित होतोय. दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला सोमवारपर्यंत महाविकास आघाडी सरकारनं परवानगी दिलेली नव्हती. येत्या 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या नियोजित मेळाव्याला परवानगी देण्याचे राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
पाहा व्हिडीओ : राहुल गांधींच्या मुंबईतील सभेसाठी दाखल याचिका काँग्रेसकडून मागे
येत्या 28 डिसेंबर हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 137वा स्थापना दिवस असून त्यानिमित्त मुंबईत जाहीर सभा घेण्याची तयारी काँग्रेसनं सुरु केली आहे. त्यासाठी 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारकडे मागण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांची शिवाजी पार्क येथे 28 डिसेंबर रोजी सभा आयोजित केली आहे. त्याबाबत ऑक्टोबर 2021 रोजी या मेळाव्याबाबत राज्य सरकारकडे रितसर अर्जही दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत या अर्जावर राज्य सरकारकडनं कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानावर एका भागात तात्पुरता मंच उभारून सार्वजनिक सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका भाई जगताप यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. सदर याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्यासमोर प्राथमिक सुनावणीसाठी पार पडणार होती. मात्र सुनावणी पूर्वीच ही याचिका बिनशर्त मागे घेत असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला कळवलं. ही विनंती मान्य करत कोर्टानं त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.
पालिका आणि आरोग्य विभागानं विहित केल्या सर्व निकषांचं या सभेत पालन करण्यात येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शिवाजी पार्क 'सायलेन्स झोन' म्हणून घोषित केला आहे. मात्र, इथं निवडक कार्यक्रम आयोजित करण्यास मूभाही देण्यात आली आहे. त्यात 6 डिसेंबर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी), 1 मे (महाराष्ट्र स्थापना दिवस) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) समावेश आहे. त्यानंतर पालिकेकडून वर्षातून 45 दिवस क्रीडाबाह्य उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले असून 45 दिवसांपैकी 11 दिवस विविध राजकीय उपक्रमांसाठी ठेवण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षीचे 11 दिवस शिल्लक असल्याचं भाई जगताप यांच्यावतीने बाजू मांडताना अँड. प्रदीप थोरात यांनी सोमवारी न्यायालयाला सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत
- आनंदवार्ता! मुंबईत रात्रीच्या वेळी होणार कोरोना लसीकरण
- मैदाने, मोकळ्या जागांना नवी मुंबईकर मुकणार, नगरविकास विभागाचा तुघलकी निर्णय
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा