(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कैद्यांचा जेलरसह पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, कल्याण आधारवाडी कारागृहातील घटना
जेलर आनंद पानसरे आणि पोलीस शिपाई भाऊसाहेब गंजवे यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही कैदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण : एखाद्या सिनेमात शोभावा असा थरार कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात घडला आहे. बराकीची तपासणी करण्यासाठी आलेल्या जेलरसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस शिपायावर दोन कैद्यांनी टोकदार वस्तूने वार केल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात जेलर आनंद पानसरे यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस शिपाई भाऊसाहेब गंजवे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
जेलर आनंद पानसरे आणि पोलीस शिपाई भाऊसाहेब गंजवे यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही कैदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मोहम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद आणि दिलखुश उर्फ अंकित महेंद्र प्रसाद या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी 9 सप्टेबर रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आनंद पानसरे आणि भाऊसाहेब गांजवे कारागृहातील कैद्यांच्या बराकीची पाहणी करत होते. मोहम्मद आणि दिलखुश या दोघांच्या बराकीतून ते निघत असतानाच अचानक यातील एका आरोपीने पानसरे यांच्यावर पाठीमागून कोणत्या तरी टोकदार वस्तूने वार केला. हल्ल्यात त्यांच्या मानेला जखम झाली तर त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या भाऊसाहेब यांच्यावर दुसऱ्या कैद्याने हल्ला केला.
आरडा ओरडा होताच इतर कर्मचारी धावत येत त्यांच्याकडील टोकदार वस्तू ताब्यात घेतली. पेनाच्या झाकणाला अडकवण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या हँडलला टोक काढून त्यांनी हे शस्त्र तयार केल्याचे आढळून आले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहात हे दोन्ही कैदी अतिशय हिंसकपणे वागत असल्याचे कारागृह अधीक्षक अ. सा. सदाफुले यांनी सांगितले.
इतर बातम्या