(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीचे वृत्त आंबेडकरांनी फेटाळले, युतीबाबत केले महत्त्वाचे वक्तव्य
Uddhav Thackeray Prakash Ambedkar: उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही बैठक होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत युतीची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Uddhav Thackeray Prakash Ambedkar: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात आज बैठक होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी हे वृत्त फेटाळले असून आज कोणतीही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन राजकीय रणनीती आखली जात आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती त्यातच शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणत ठाकरेंसोबतच युतीचे स्पष्ट संकेत दिले. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा सगळ्यांना याची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून सकारात्मक चर्चा होत असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, शिवसेनेसोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, त्यातील अधिक तपशीलाबाबत चर्चा सुरू आहेत. आपण काही दिवसांपासून ईशान्य भारताच्या भेटीवर होतो. रविवारी मुंबईत दाखल झालो आहे. आज कोणतीही बैठक नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. एकदा युती करण्याबाबत जाहीर घोषणा झाल्यानंतर त्यात कोणतीही लपवाछपवी करण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले.
महापरिनिर्वाण दिनीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक आहे. या बैठकीसाठी आपण जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याशिवाय इतर कोणतीही बैठक नसल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडी करण्याबाबत वेळ घेणारच
सध्या कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे युती-आघाडी करण्याबाबत कोणालाही घाई नसल्याचेही आंबेडकरांनी म्हटले. निवडणुका तोंडावर असत्या तर तातडीने निर्णय झाले असते. त्यामुळे कोणी वेळ घेत असेल तर त्यात काही चुकीचे नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
बैठकीचे वृत्त फुटल्याने प्रकाश आंबेडकर नाराज?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या आजच्या बैठकीबाबतचे वृत्त फुटल्याने प्रकाश आंबेडकर नाराज झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत जातांना वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असेल की शिवसेनेचा मित्र पक्ष हे स्पष्ट करण्याची भूमिका वंचितने मांडली होती. त्यानंतर अद्यापही शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.