Sanjay Rathod | संजय राठोड हेच पूजा चव्हाणचे मारेकरी, त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे : चित्रा वाघ
पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं, अशी प्रतिक्रिया वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. त्यावर "पूजा चव्हाणचे मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे," अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
मुंबई : संजय राठोडच पूजा चव्हाणचे मारेकरी असून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर सुमारे 14 दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज समोर आले. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राठोड यांनी दिली.
यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, "या सगळ्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरु आहे. तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसं नाही. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे."
"अतिशय दुर्दैवी आणि शरमेची गोष्ट आहे की महाविकास आघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांचे मंत्री, आमदार बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे आले, त्यांची एकी महाराष्ट्राने पाहिली. ही एकी भंडाऱ्यात 11 निष्पाप जीवांचा होरपळून मृत्यू झाला, ४० दिवस एफआयआर दाखल झाला नाही, तेव्हा दिसली नाही," असंही त्या पुढे म्हणाल्या.
Sanjay Rathod | संजय राठोड का आवडे सर्वांना?
पोहरादेवी गर्दी प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा : प्रवीण दरेकर एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं आवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया संजय राठोड यांनी आज पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरु आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करु नका अशी हात जोडून विनंती त्यांनी केली."
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी मंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यातच पूजा चव्हाण आणि मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.