Maharashtra Politics: मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची मिमिक्री पाहू; संजय राऊत यांचा राज ठाकरेंना चिमटा
Maharashtra Politics: आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची पाहू असे म्हणत, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष ठाकरे यांना चिमटा काढला.
Sanjay Raut On Raj Thackeray: राजकारण हे मिमिक्री नव्हे असे सांगताना आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची पाहू असा चिमटा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना काढला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी, मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेबाबत विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. राऊत यांनी म्हटले की, मिमीक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज काढणे, नक्कल करणे हे आता खूप झाले. आपण मॅच्युअर्ड झालेले आहात. संपूर्ण महाराष्ट्र पाहा असे आवाहन करताना राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचे राजकारण किती काळ चालणार असा प्रश्नही केला.
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना संघटनात्मक कामे करण्याचा सल्ला दिला. आमच्या पक्षावर संकटे आली असूनही आम्ही काम करत असून लढत आहोत. ज्यांनी आमच्यावर टीका केली, त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. बुलढाण्यातील प्रतिसाद पाहायला हवा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला, सभेला मोठी गर्दी लोटली होती, असेही राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी मागील तीन महिन्यात जे कष्ट घेतले आहेत, मेहनत घेतली. हे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस तरी एवढी मेहनत घेऊन दाखवावी असे आव्हानही राऊत यांनी केले.
राज ठाकरे यांनी काय म्हटले होते?
मुंबईतील गोरेगावमध्ये नेस्को मैदानात रविवारी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज यांनी यावेळी उद्धव यांची नक्कलदेखील केली. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत असल्याचे राज यांनी म्हटले. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.