(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यातील चार मनपा आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्यांमागे राजकारण : विरोधकांचा आरोप
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा चार महानगरपालिकांचे आयुक्त तडकाफडकी बदलण्यात आल्याने या बदल्यांच्या मागे नेमके कारण काय असा सर्वांना प्रश्न पडला आहे. Covid-19 ला रोखण्यात आलेले अपयश की काही राजकीय रंग तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील आयुक्त विजय सिंगल, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आयुक्त चंद्रकांत डांगे, नवी मुंबई महानगरपालिकेतील आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे या सर्व अधिकाऱ्याची एकाच दिवसात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमण्यात आले आहेत. ठाण्यात बिपिन शर्मा, मीरा भाईंदर येथे डॉ विजय राठोड, नवी मुंबई येथे अभिजीत बांगर आणि उल्हासनगर येथे राज दयानिधी या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
मात्र या बदल्या चुकीच्या असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच ज्या आयुक्तांच्या बदल्या केल्या त्यांच्या पाठीशी असल्याचे देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात Covid-19 ने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या बदल्या होण्याच्या मागे संबंधित महानगरपालिकेतील Covid-19 च्या रुग्णांची वाढती संख्या हे मुख्य कारण सांगितले जात आहे.
आता नजर टाकूयात 1 जून रोजी आणि 24 जून रोजी असलेल्या रुग्णांची आकडेवारीवर!
ठाणे आजच्या तारखेला किती रुग्ण - 6630 1 जूनला किती रुग्ण - 3032 किती जणांचा मृत्यू आतापर्यंत - 223 डबलिंग रेट - 29.6 दिवस
नवी मुंबई आजच्या तारखेला किती रुग्ण - 5072 1 जूनला किती रुग्ण - 2284 किती जणांचा मृत्यू आतापर्यंत - 177 डबलिंग रेट - 25 दिवस
उल्हासनगर आजच्या तारखेला किती रुग्ण - 1208 1 जूनला किती रुग्ण - 380 किती जणांचा मृत्यू आतापर्यंत - 36 डबलिंग रेट - 15 दिवस
मीरा भाईंदर आजच्या तारखेला किती रुग्ण - 2481 1 जूनला किती रुग्ण - 757 किती जणांचा मृत्यू आतापर्यंत - 116 डबलिंग रेट - दिवस
ही आकडेवारी घरी दिवसेंदिवस वाढत असताना दिसत असली तरी, या महानगरपालिकांमध्ये रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच वाढलेला आहे. रिकव्हरी रेट प्रमाणेच रग्ण दुपटीचा कालावधीही वाढलेला आहे. मात्र असे असून देखील या सर्व आयुक्तांना काम करण्यास अतिशय कमी वेळ मिळाल्याचे देखील दिसून येत आहे. ठाण्यातील विजय सिंघल यांची नियुक्ती 20 मार्च 2020 रोजी झाली होती. नवी मुंबईच्या अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती 18 जुलै 2019 रोजी झाली होती. उल्हासनगर महापालिकेत समीर उन्हाळे यांची नियुक्ती 20 मे 2020 म्हणजे अगदीच 33 दिवसांपूर्वी झाली होती. तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती 15 फेब्रुवारी 2020 रोजी झाली होती.
त्यामुळे अधिकाऱ्यांप्रमाणेच ठाण्यातील राजकारण्यांना देखील रुग्ण वाढीसाठी दोषी समजले पाहिजे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मनसेच्या अविनाश जाधव यांनी पालकमंत्र्यांचांही राजीनामा घ्या, असे सांगून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. जर covid-19 हे कारण असेल तर फक्त आयुक्तच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी पालकमंत्री देखील जबाबदार आहेत असे अविनाश जाधव म्हणाले. तसेच निरंजन डावखरे यांनी देखील एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही मंत्र्यांना दोषी ठरवले आहे. आयुक्तांच्या बदली करुन या दोन्ही मंत्र्यांना मोकाट सोडल्याचा गंभीर आरोप डावखरे यांनी केला आहे.
यासंदर्भात पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता यामागे कोणतेही राजकारण नसून या बदल्या नेहमीप्रमाणेच झाल्याचे त्यांनी सांगितले. अविनाश जाधव यांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, "या कठीण परिस्थितीत ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना खुशाल करु दे. कोण रस्त्यावर उतरुन कामे करतो आहे ते नागरिकांना सांगायची गरज नाही."
आयुक्त बदली प्रकरणामागे कोरोना जरी प्राथमिक कारण दिसत असले तरी त्यामागे राजकीय कारणही असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यात तर गेले अनेक दिवस आयुक्त आणि राजकीय नेते यांच्यातील संघर्ष वाढल्याचेही त्यांनी सांगितले. मिलिंद बल्लाळ हे ठाण्यातील सर्वात जुन्या 'ठाणे वैभव' या दैनिकाचे संपादक आहेत.
ठाणे जिल्ह्यातील या आयुक्त बदलीप्रकारामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. या बदल्यांच्या मागे एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेऊन राज्य सरकारमधील एक बडा नेता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला नक्कीच राजकीय रंग देखील आहे. कारण कोणतेही असो मात्र नवीन आयुक्त आल्यानंतर परिस्थिती समजून घेऊन त्यांना काम सुरु करेपर्यंत थोडा काळ निश्चित जाईल. त्यामुळे या सर्व प्रकारात नागरिकांचे हाल होऊ नयेत इतकीच अपेक्षा.